नागपूर : लॉकडाऊनमध्ये जीवनाश्यक वस्तूंची दुकानेवगळता सर्वच दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. यावर उपाय म्हणून बहुतांश व्यापारी दुकानासमोर उभे राहून ग्राहकांना दुकानातून वस्तू काढून विक्री करीत आहेत. ही स्थिती सर्वच बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे. अशा प्रकारातून कोरोना संसर्गाचा धोका असला तरीही पथकासोबतच्या आर्थिक व्यवहारामुळे कारवाई होत नसल्याची माहिती आहे. दुकाने ३१ मेपर्यंत बंद राहणार आहेत, हे विशेष.
प्रत्येक व्यापाऱ्याकडे ग्राहकांचे मोबाईल क्रमांक आहेत. या क्रमांकाद्वारे व्यापाऱ्यांतर्फे ग्राहकांसोबत संपर्क साधण्यात येत आहे. ही बाब इतवारी, मस्कासाथ, गांधीबाग, महाल, सीताबर्डी, खामला, जरीपटका, सक्करदरा, हुडकेश्वर, मानेवाडा रोड येथील बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे. व्यापारी घरी बसण्याऐवजी दुकानासमोर खुर्च्या टाकून बसत आहेत. मोबाईलवर संपर्क साधून ग्राहक आल्यास त्यांना दुकानाचे शटर वर करून माल देण्यात येत आहे. बहुतांश दुकानाच्या आत कर्मचारी हजर असतात. ही युक्ती सर्वच व्यापाऱ्यांनी अवलंबविली आहे. काही दिवसांपूर्वी एका दुकानातून मनपाच्या पथकाने सायंकाळी ४२ जणांना दुकानातून बाहेर काढले होते. या दुकानात ग्राहक लग्नाची खरेदी करीत होते. मनपाने दुकानदाराला दंड ठोठावला होता. अशीच युक्ती सावजी व बारमालक अवलंबित आहेत. पोलिसांनी अशांवर कारवाई करून दुकानाला सील ठोकून दंड वसूल केला होता.
नाव न सांगण्याच्या अटीवर व्यापारी म्हणाले, दुकाने एप्रिलपासून बंद आहेत. अशा संकटकाळात आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. मोबाईलवर संपर्क साधून ग्राहकांना मालाची डिलिव्हरी देण्यात येत आहे. इतवारी आणि गांधीबाग, खामला, जरीपटका भागातील अनेक कापड दुकानदार मालाची विक्री करीत आहेत. ग्राहकाला माल देण्यासाठी शटर वर करण्यात येते. त्यानंतर पुन्हा खाली होते. दुकाने बंद असतानाही वीजबिल, कर्मचाऱ्यांचे पगार आणि बँकांचे कर्जाचे हप्ते सुरूच आहेत. उत्पन्न न झाल्यास भरणा कसा करणार, असा सवाल आहे. अशा पद्धतीने दररोज २० ते ३० टक्के व्यवसाय होतो. प्रशासनाने वेळेचे बंधन ठेवून दुकाने सुरू करावीत.