नागपूर : प्रसिद्ध वकील अॅड. श्रीकांत जगन्नाथ खंडाळकर (वय ५२) यांच्या मृत्यूने अनेक प्रश्न उपस्थित केले असून, ‘सुसाईड नोट’वरून त्यांनी आत्महत्या केल्याचा दावा केला जात असला तरी ही आत्महत्याच आहे, असे ठामपणे सांगायला पोलिसांसकट कुणीच तयार नाही. त्यामुळे अॅड. खंडाळकर यांच्या मृत्यूने सुरू असलेल्या उलटसुलट चर्चेत अधिकच भर पडली आहे. शनिवारी सायंकाळपासून बेपत्ता झालेल्या अॅड. खंडाळकर यांचा मृतदेह जिल्हा न्यायमंदिर परिसरात (इमारतीच्या मागच्या भागात) रविवारी दुपारी ४.३० ला आढळला. सामाजिक बांधिलकी ठेवून वकिली करणाऱ्या आणि सिंचन घोटाळा, रेतीघाटांवरील घोटाळ्यासह अनेक प्रकरणांच्या जनहित याचिका दाखल केल्या होत्या. अॅड. खंडाळकर यांनी सिंचन घोटाळ्यासंदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेमुळेच राजकीय वर्तुळाला जबर हादरे बसले. अॅड. खंडाळकर प्रसिद्धीच्या झोतात येऊनही नेहमीच सामाजिक दायित्वातून वकिली करीत होते. त्यामुळे ते आत्महत्या करू शकतात, यावर कुणी विश्वासच ठेवायला तयार नाही. त्यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत असलेला मजकूर बघता व ते त्यांचेच अक्षर आणि सही असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितल्यामुळे ‘ही आत्महत्या’ असल्याचे मानून पोलिसांनी सदर ठाण्यात रविवारी अकस्मात मृत्यूची नोंद केली. (प्रतिनिधी)शेवटचा कॉल १२ मिनिटांचा अॅड. खंडाळकर मृतावस्थेत आढळल्यानंतर त्यांच्या पॅन्टची अवस्था या आणि घटनेपूर्वीच्या उघड झालेल्या काही बाबी लक्षात घेता ‘आत्महत्या’ हा अंतिम निष्कर्ष नसल्याचे खुद्द पोलीस अधिकारीच कबूल करीत आहेत. त्याचमुळे चोहोबाजूने आणि सूक्ष्मपणे पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. दरम्यान, त्यांच्या मोबाईलचा कॉल डेटा रेकॉर्ड (सीडीआर) पोलिसांनी आज मिळवला. त्यात शेवटच्या कॉलमध्ये ते १२ मिनिटे बोलल्याचे दिसून येत आहे. या प्रदीर्घ संभाषणात त्यांचे काय संभाषण झाले, त्याचीही पोलीस चौकशी होणार आहे. वैद्यकीय अहवालाने वाढले गूढसोमवारी पोलिसांनी अॅड. खंडाळकर यांचा पोस्टमार्टेम रिपोर्ट मिळवला. त्यात शरीरावर अनेक जखमा झाल्यामुळे (डेथ ड्यू टू मल्टिपल इंज्युरी) अॅड. खंडाळकर यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी नमूद केल्याचे पोलीस अधिकारी सांगतात. अर्थात या अहवालातून अॅड. खंडाळकरांनी मृत्युपूर्वी उडी घेतली की त्यांना कुणी धक्का दिला किंवा त्यांना कुणी उडी घेण्यासारखी स्थिती निर्माण केली, ते स्पष्ट होत नाही. त्यामुळे गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचा तपास सोपविण्यात आला आहे.
श्रीकांत खंडाळकर यांचा मृत्यू संशयाच्या भोवऱ्यात
By admin | Updated: December 1, 2015 06:59 IST