नागपूर : श्रीसूर्या समूहाने केलेल्या कोट्यवधीच्या घोटाळ्याचा एमपीआयडी विशेष न्यायालयात खटला चालविण्यासाठी राज्यपालांनी अॅड. बी. एम. करडे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. शेकडो पीडित गुंतवणूकदारांनी शासनाकडे ही मागणी केली होती. करडे यांच्या नियुक्तीमुळे पीडित गुंतवणूकदारांना न्याय मिळण्याची आशा बळावली आहे. समीर सुधीर जोशी आणि त्याची पत्नी पल्लवी समीर जोशी हे या महाघोटाळ्याचे म्होरके आहेत. त्यांनी मुदत ठेवींवर त्रैमासिक साडेबारा टक्के व्याजाचे आमिष दाखवून २००५ ते १४ सप्टेंबर २०१३ या काळात ५०९२ गुंतवणूकदारांची २३९ कोटी रुपयांनी फसवणूक केलेली आहे. सोमलवाडा येथील रहिवासी हॉटेल व्यवसायी अमित गोविंद मोरे यांच्या तक्रारीवरून राणा प्रतापनगर पोलिसांनी समीर जोशी आणि पल्लवी जोशी यांच्याविरुद्ध १४ सप्टेंबर २०१३ रोजी भादंविच्या ४०६, ४२०, ३४ आणि महाराष्ट्र गुंतवणूकदार (वित्तसंबंध) संरक्षण अधिनियम १९९९ च्या कलम ३ अन्वये गुन्हे दाखल केले होते. आर्थिक गुन्हे पथकाकडे तपास सोपविण्यात आला होता. पोलीस निरीक्षक विष्णूपंत भोये यांनी तपास करून १३ डिसेंबर २०१३ रोजी या दोन्ही आरोपींविरुद्ध ३०२० पानी आरोपपत्र दाखल केलेले आहे. यात ६९९ जणांना साक्षीदार करण्यात आले आहे. या प्रकरणात एजंटांनाही आरोपी करण्यात आलेले आहे. सध्या समीर जोशी नागपूर मध्यवर्ती कारागृहात असून पल्लवी जामिनावर आहे.(प्रतिनिधी)
श्रीसूर्या प्रकरण, करडे विशेष सरकारी वकील
By admin | Updated: May 29, 2015 02:28 IST