लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : तालुक्यात काेराेनाचा प्रकाेप वाढत आहे. यासाठी टेस्टिंग व लसीकरण हे दाेनच पर्याय उपलब्ध आहेत, परंतु नागरिक लसीकरणासाठी पुढे येत नसून काेविड टेस्ट करीत नाहीत. त्यामुळे प्रशासनापुढे माेठा पेच निर्माण झाला आहे. प्रशासनातर्फे विविध उपक्रम राबवून जनजागृतीचे प्रयत्न सुरू केले आहे. मात्र, त्याकडे नागरिकांनी दुर्लक्ष केले आहे. रामटेक तालुक्यात ३५,७९३ नागरिकांना लस देणे अपेक्षित आहे. यापैकी आतापर्यंत १८,५६४ नागरिकांनी लसीकरण केले आहे. यात फक्त ४५ टक्के लसीकरण झाले आहे.
तालुक्यात १६ लसीकरण केंद्र सुरू आहेत. प्राथमिक आराेग्य केंद्र व उपकेंद्रांतर्गत, तसेच उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे लसीकरणाची साेय आहे, परंतु याला नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण भागात लसीबाबत बरेच गैरसमज आहेत. लसीकरण केल्याने आजारी पडताे. ताप येताे, कधी-कधी मृत्यू हाेताे अशी भीती निर्माण झाल्याने नागरिक लसीकरण करताना दिसत नाहीत. दरम्यान, लसीकरण वाढविण्याबाबत तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी तालुक्यातील डाॅक्टर, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदींची बैठक घेऊन लसीकरणाबाबत जनजागृती करण्याचे आवाहन केले. दाेन गावांसाठी एक नियंत्रक नेमला आहे, तसेच ६० कुटुंबासाठी एक अधिकारी नियुक्त केला आहे. त्याद्वारे लाभार्थ्यांची यादी केली आहे. लसीकरणाला जाण्यासाठी वाहतूक व्यवस्था केली आली. १०० नागरिक लस घेण्यास तयार असल्यास तेथे केंद्र सुरू करायचे आहे.
लसीकरणाबाबत प्रशासनातर्फे जनजागृती केली जात आहे. लसीकरणामुळे काेविड पाॅझिटिव्ह आले तरी जीव वाचू शकताे. लस घेतल्यामुळे प्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे काेराेनाचा त्रास कमी हाेताे. लसीमुळे फक्त थाेडा ताप येऊ शकताे. इतर काहीही परिणाम हाेत नाही. त्यामुळे नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावे, काही शंकाकुशंका असल्यास आराेग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी केले आहे.
....
पाच गावे सील
काेराेना साखळी ताेडण्यासाठी रामटेक शहरातील नेहरू वाॅर्ड, अंबाळा वाॅर्ड व टिळक वाॅर्ड सील केले असून, तालुक्यातील माैदी, सालई, पंचाळा (बु.), महादुला, मनसर ही पाच गावे सील करण्यात आली आहेत. काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी टेस्टिंग व लसीकरण करावे, असे आवाहन तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी केले आहे.