प्रशासनाने कोरोना संक्रमण टाळण्यासाठी मंगळवारपासून पुन्हा लॉकडाऊन घोषित केले आहे. काही नियम आणि अटी घालून जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना यातून सूट दिली. मंगळवारी सकाळी सीताबर्डीच्या मुख्य रस्त्यावर बहुतांश दुकाने बंद होती. दोन-चार फुटवेअर, हार्डवेअर व कपड्यांची दुकाने सुरू झाली होती. पण संपूर्ण मार्केट बंद होते. झाशी राणी चौक, मेहाडिया चौक, मुंंजे चौक, मोदी नंबर १, २ व ३ मधील दुकानेसुद्धा बंद होती. फूटपाथवर किरकोळ विक्रेत्यांनी दुकान थाटण्याचा प्रयत्न केला ,मात्र पोलिसांनी त्यांना धुडकावून लावले. सकाळच्या सुमारास पोलिसांचा फार चोख बंदोबस्त दिसून आला नाही. वाहतूक नियमित सुरूच होती.
धरमपेठ
शंकरनगर चौक ते लॉ कॉलेज चौक दरम्यान असलेली बाजारपेठ लॉकडाऊनमुळे बंद होती. गोकुळपेठेतील भाजीबाजार व फळ मार्केट सुरळीत सुरू होते. बाजारातील काही दुकाने बंद होती. पण व्यापारी व कर्मचारी दुकानापुढे आले होते. या भागात महापालिकेचे वाहन लॉकडाऊनच्या नियमांची अनाऊन्समेंट करीत होते. फरसाणची काही दुकाने सुरू होती. तेथूनही पार्सल दिले जात होते. मात्र या रस्त्यावरील वाहतूक काहीशी मंदावली होती. पोलीस यंत्रणा दुपारी १२ वाजेपर्यंत दिसून आली नाही.