निशांत वानखेडे, नागपूरनागपूर : ईयत्ता दहावीचा इंग्रजीचा पेपर चक्क परीक्षा केंद्रातून माेबाईलवर फाेटाे काढून व्हायरल करण्याचा प्रकार भंडारा जिल्ह्यातील लाखांदूरजवळच्या एका केंद्रावर घडला. सुदैवाने पेपर व्हायरल झाला नाही. या प्रकरणातील आराेपी फरार असून केंद्र प्रमुख व पर्यवेक्षकावर गुन्हा दाखल करून पुढची कारवाई केली जात आहे.
भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्याच्या सीतारा बारवा येथे हा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. दहावी बाेर्डाचा इंग्रजीचा पेपर शनिवारी हाेता. सकाळी ११ वाजता हा पेपर सुरू झाला. विभागीय मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पेपर सुरू झाल्यानंतर ११.३० वाजताच्या सुमारास संबंधित केंद्रातील एक कर्मचारी पेपरचे फाेटाे काढताना आढळला. ही माहिती बाेर्डाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार त्या भागातील भरारी पथकाला माहिती देण्यात आली. त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांचे भरारी पथक १० मिनिटात बारवा येथील केंद्रावर पाेहचले. हा प्रकार खरा असल्याचे पथकाच्या लक्षात आले. यादरम्यान पेपरचा फाेटाे काढून व्हायरल करण्याचा प्रयत्न करणारा आराेप कर्मचारी केंद्रावरून पसार झाला हाेता.
झालेल्या प्रकाराची गंभीरता लक्षात घेता सीतारा बारवाच्या केंद्राचे केंद्र प्रमुख, हाॅलचे पर्यवेक्षक आणि फरार कर्मचाऱ्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीतारा बारवा येथे जिल्हा परिषद आणि महात्मा ज्याेतिबा फुले शाळेत परीक्षेचे केंद्र आहेत. त्या दाेन्ही केंद्राचे कर्मचारी प्रकरणात सहभागी आहेत काय, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी काेण काेण सहभागी आहेत, त्याचा शाेध घेण्यात येत असल्याची माहिती वंजारी यांनी दिली.
चंद्रपूर जिल्ह्यात सापडले दाेन काॅपी बहाद्दर
दरम्यान शनिवारच्या दहावीच्या इंग्रजीच्या पेपरमध्येही दाेन काॅपी बहाद्दरांना पकडण्यात आले. ही दाेन्ही प्रकरणे चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर तालुक्यातील केंद्राचे आहेत. या प्रकरणी संबंधित केंद्राचे केंद्र प्रमुख व पर्यवेक्षक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती बाेर्ड अध्यक्ष चिंतामण वंजारी यांनी दिली.
इंग्रजीचा पेपर साेपा, मुलांच्या चेहऱ्यावर हास्यइंग्रजीचा पेपर कठीण मानला जाताे. त्यामुळे एक प्रकारचे दडपण परीक्षेस जाणाऱ्या मुलांवर असते. मात्र शनिवारी केंद्राबाहेर पडलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद हाेता. जाताना दडपण हाेते पण पेपर पाहून टेंशन दूर झाल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. पेपर साेपा हाेता व चांगला साेडविला, अशी प्रतिक्रिया मुलांकडून मिळाली.