नागपूर : बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यात सायबर पोलिसांनी शनिवारी (दि. १९) नागपूर शहरातील दोन मुख्याध्यापकांना अटक केल्यामुळे खळबळ उडाली आहे. अटक केलेल्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळांमध्ये बेकायदेशीर नियुक्ती असलेल्या शिक्षकांचे वेतन प्रस्ताव आपल्या सहीनिशी पाठविल्याचे उघड झाले आहे.
वाठोडातील शैलेशनगर येथील ओमनगर उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शेषराव आसाराम कुथे (५७, रा. चकोले वाडी, खरबी) आणि मानेवाडातील विद्याभूषण उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हेमंत मधुकर राठोड (३४, रा. रामकृष्णनगर दिघोरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी मुख्याध्यापकांची नावे आहेत.यातील शेषराव कुथेच्या शाळेत तीन सहायक शिक्षकांची, तर हेमंत राठोडच्या शाळेत चार सहायक शिक्षकांची बेकायदेशीर नियुक्ती करण्यात आलेली आहे. या शिक्षकांची बेकायदेशीर नियुक्ती केलेली असल्याची बाब माहीत असूनही या दोन्ही मुख्याध्यापकांनी त्यांच्या वेतनाचे प्रस्ताव दर महिन्याला आपल्या सहीने वेतन अधीक्षक कार्यालयात पाठविले. त्यानुसार या बोगस शिक्षकांचे वेतन काढण्यात आले. यात आरोपी मुख्याध्यापक शेषराव कुथे आणि हेमंत राठोड या दोघांनीही आपला आर्थिक फायदा करून घेत शासनाची फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे. दोन्ही मुख्याध्यापकांविरुद्ध कलम ३१९ (२), ३१, ८ (४), ३३८, ३३६ (३), ३४० (१), ३४० (२), ६१ (२), सहकलम ६६ (क) माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींच्या अटकेबाबत त्यांच्या कुटुंबीयांना सायबर पोलिसांनी सूचनापत्र दिले आहे.