She ran away with lover on bike | प्रियकराच्या दुचाकीवर बसून ‘ती’ सुसाट गेली
प्रियकराच्या दुचाकीवर बसून ‘ती’ सुसाट गेली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पतीसमोर आपल्या प्रियकराच्या दुचाकीवर बसून एक नवविवाहिता पळून गेली. शनिवारी दुपारी ११.३० ते १२ च्या सुमारास गणेशपेठ बसस्थानक परिसरात ही अफलातून घटना घडली.
अमोल डोंगरे (वय २५) असे नवविवाहितेला तिच्या पतीसमोरून पळवून नेणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तो अजनीच्या इंदिरानगरात राहतो. अमोलचे २१ वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. तिचे महिनाभरापूर्वी दुसºया एका तरुणासोबत लग्न झाले. काही दिवसांपूर्वी ती माहेरी आली. पाहुणपण झाल्यानंतर ती तिच्या पतीसोबत सासरी जाण्यासाठी रेल्वेस्थानकाकडे निघाली. हे नवदाम्पत्य रेल्वेस्थानकाकडे जात असताना शनिवारी सकाळी ११.३० च्या सुमारास आरोपी अमोल त्यांच्याजवळ आला. त्याने रेल्वेगाडीला विलंब असल्याची थाप मारून बसने गावाला जाण्याचा सल्ला देत त्या दोघांना गणेशपेठ बसस्थानकावर आणले. तेथे त्याने आपली मोटरसायकल उभी केली. प्रेयसीच्या पतीच्या हातात एक तिकीट दिले. त्याला गावाला परतण्याचा सल्ला देऊन आरोपी अमोलने आपल्या प्रेयसीला दुचाकीवर बसवले. ती देखिल त्याचीच वाट बघत असल्याप्रमाणे अमोलच्या दुचाकीवर बसली आणि ते दोघे सुसाट वेगाने पळून गेले. या प्रकारामुळे पतीला प्रचंड मानसिक धक्का बसल्याने बराच वेळ तो बसस्थानक परिसरात फिरत राहिला. नंतर त्याने सासरच्यांना या प्रकाराची माहिती देऊन त्यांच्या मदतीने गणेशपेठ ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी अमोलविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.


Web Title: She ran away with lover on bike
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.