सफेलकर टोळीकडून अनेक खुलासे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:09 AM2021-04-04T04:09:27+5:302021-04-04T04:09:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर: गँगस्टर रणजित सफेलकर आणि त्याच्या टोळीतील साथीदारांकडून मनीष श्रीवास हत्याकांडासोबतच अनेक गुन्ह्यांची माहिती पुढे आली ...

Several revelations from the Safelkar gang | सफेलकर टोळीकडून अनेक खुलासे

सफेलकर टोळीकडून अनेक खुलासे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर: गँगस्टर रणजित सफेलकर आणि त्याच्या टोळीतील साथीदारांकडून मनीष श्रीवास हत्याकांडासोबतच अनेक गुन्ह्यांची माहिती पुढे आली आहे. पोलीस या माहितीची शहानिशा करीत आहेत. सफेलकर टोळीने सांगितलेल्या माहितीपैकी ५० टक्के माहितीही खरी निघाल्यास अनेकांचे बुरखे फाटू शकतात अन् धक्कादायक घडामोडी घडू शकतात, असा सूत्रांचा दावा आहे.

जमीन बळकावणे, हत्या करणे, हत्येचा प्रयत्न करणे, शस्त्र आणि अमली पदार्थाची तस्करी करणे, खंडणी वसुली करणे अशा अनेक गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या सफेलकर गँगच्या गुन्ह्यांची यादी भली मोठी आहे. काही नेत्यांनी हात ठेवल्यामुळे सफेलकर आणि त्याचे गुंड उजळ माथ्याने फिरत होते. मात्र, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांनी आपल्या सहकाऱ्यांकडून विशेष वर्कआऊट करवून घेत सफेलकर आणि त्याच्या टोळीतील गुंडांच्या पापाचा घडा फोडला. एकीकडे १२ वर्षांपूर्वी अपहरण करून ठार मारण्यात आलेल्या मनीष श्रीवास नामक गुंडाच्या हत्येचे प्रकरण खोदून काढले तर दुसरीकडे ५ कोटींची सुपारी घेऊन आर्किटेक्ट एकनाथ निमगडेची हत्या करवून घेतल्याचेही उघड केले. या प्रकरणात सफेलकरसह त्याच्या टोळीतील गुंडांना पोलिसांनी अटकही केली. सध्या ते गुन्हे शाखेच्या कस्टडीत असून पोलीस त्यांची चौकशी करीत आहेत. गेल्या चार दिवसांच्या चाैकशीत सफेलकर आणि त्याच्या गुंडांनी मनीष श्रीवास आणि एकनाथ निमगडेच नव्हे तर अनेक गुन्ह्यांशी संबंधित धक्कादायक खुलासे केले आहेत. अनेक नावेही सांगितली आहेत. पोलीस त्याची शहानिशा करीत आहेत. सफेलकर आणि गुंडांनी दिलेली माहिती खरी असल्याचे उघड झाल्यास पोलिसांशी सख्य साधून पोलिसांच्या नावावर दलाली करणाऱ्या अनेकांचे बुरखे फाटू शकतात.

----

त्यांच्यातही घबराट

मिळालेल्या माहितीनुसार, सफेलकरने दिलेली माहिती खरी की खोटी ते तपासण्यासाठी काही संशयितांना ताब्यात घेऊन पोलीस चाैकशी करीत आहेत.

अट्टल गुन्हेगार आणि मांडवलीखोरांशी आतमधून संबंध ठेवून दुसरीकडे पोलिसांसोबत गोडबोलेपणा करणाऱ्या अनेकांचे यामुळे धाबे दणाणले आहे. पोलिसांनी पुरावे गोळा करून मानगुट पकडल्यास काय करायचे, कोणती भूमिका घ्यायची, यासंबंधाने ही मंडळी बैठका, ऑनलाईन चर्चा करीत असल्याचे समजते.

----

Web Title: Several revelations from the Safelkar gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.