लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारताच्या सार्वजनिक आरोग्य संरचनेत क्रांती घडवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत, नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) अत्याधुनिक बायो-सेफ्टी लेव्हल-३ (बीएसएल) प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (एनसीडीसी), नवी दिल्लीसोबत सामंजस्य करार केला. यामुळे बर्ड फ्लू, झिका, निपाह, जपानी एन्सेफलायटिस, एमपॉक्स यांसारख्या अत्यंत गंभीर आजाराचे 'एम्स'मध्येच निदान होण्यास मदत होणार आहे.
झुनोटिक इन्फेक्शन्स' जे प्राण्यांकडून मानवांमध्ये पसरतात त्याची तातडीने तपासणी होणे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे यातील आजाराच्या उद्रेकांचे व्यवस्थापन आणि नियंत्रण मिळविणे शक्य होते. या पार्श्वभूमीवर 'एम्स'मधील 'बीएसएल-३' प्रयोगशाळा सार्वजनिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. पंतप्रधान आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन अंतर्गत ही प्रयोगशाळा उभारली जाईल, अशी माहिती एम्स नागपूरचे कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत पी. जोशी यांनी दिली. ते म्हणाले, ही प्रयोगशाळा आजाराच्या निदानासोबतच महाराष्ट्रातील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांना प्रशिक्षण देण्यासाठी एक केंद्र म्हणूनही काम करेल. अत्यंत संसर्गजन्य रोगांच्या उद्रेकाच्यावेळी नागपूर, विदर्भ आणि गडचिरोली, छत्तीसगड, तेलंगणासारख्या लगतच्या प्रदेशातील लोकांसाठी ही प्रयोगशाळा अत्यंत फायदेशीर ठरेल.
सामंजस्य करारानुसार, 'एनसीडीसी', नवी दिल्लीने 'बीएसएल-३' सुविधेसाठी एकूण ३० कोटींचा निधी मंजूर केला आहे. यातील २५ कोटाँचा निधी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आणि ५ कोटींचा निधी आवश्यक उपकरणे, किट आणि उपभोग्य वस्तू खरेदी करण्यासाठी केला जाणार आहे.
महाराष्ट्रातील पहिले वैद्यकीय महाविद्यालयएम्स नागपूरच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रमुख आणि बीएसएल-३ सुविधेच्या प्रकल्प प्रभारी डॉ. मीना मिश्रा यांनी सांगितले, सध्या महाराष्ट्रात फक्त नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही), पुणे येथे 'बीएसएल-३' प्रयोगशाळा आहे. एम्स नागपूरमध्ये ही प्रयोगशाळा असणारी महाराष्ट्रातील पहिली वैद्यकीय संस्था ठरणार आहे. 'बीएसएल-३' या प्रयोगशाळेत विशेष प्रशिक्षित कर्मचारी संरक्षक उपकरणे वापरून काम करतात. यामुळे कोणतेही हानिकारक जीवाणू किंवा विषाणू प्रयोगशाळेतून बाहेर पडणार नाहीत याची खात्री केली जाते, ज्यामुळे शास्त्रज्ञ आणि नागरिक दोन्ही सुरक्षित राहतात. ३० मे २०२५ रोजी नागपूर, महाराष्ट्रात हा सामंजस्य करार 'एनसीडीसी' नवी दिल्ली व नागपूर 'एम्स' यांच्यात झाला. 'एनसीडीसी'चे अतिरिक्त संचालक डॉ. अंकुर गर्ग व एम्सचे संचालक डॉ. प्रशांत जोशी यांनी यावर स्वाक्षरी केली. यावेळी 'एनसीडीसी'चे सहसंचालक डॉ. अंकुर गर्ग आणि 'एपीएचओ' नागपूरच्या डॉ. आराधना भार्गव उपस्थित होत्या.