१९ जणांची नियुक्ती
नागपूर : शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दूरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव यामूळे सर्व मोठ्या चौकात वाहतुकीची कोंडी होणे हा नवीन प्रकार राहिला नाही. यावर उपाययोजना म्हणून जनआक्रोशच्या पुढाकाराने पोलीस आयुक्तांनी १९ अतिरिक्त वाहतूक अधिकार्यांची नियुक्ती केली आहे. ५० ते ७२ वयोगटातील हे अधिकारी विविध चौकांत वाहतूक सुरळीत करण्यासाठी आपला वेळ देणार आहेत. काही वर्षांपूर्वी काही चौकांमध्ये ज्येष्ठ नागरिक वाहतूक सुरळीत करताना दिसून यायचे. त्यांच्या शिटीवर चौकातील वाहतूक चालायची. अनेक वाहनधारकांचे ते तर मित्र झाले होते. अशा चौकांमध्ये वाहतूक सिग्नल तोडण्याचे प्रकार बंद झाले होते. परंतु दरम्यानच्या काळात पोलीस मित्र म्हणून संबोधले जाणारे काही युवक चौकात कमी आणि रस्त्याच्या आडोशाला जास्त दिसत होते. पोलिसांना मदत म्हणून वाहन पकडण्याचेच काम ते करीत होते. यांच्या कार्यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. आता पुन्हा जनआक्रोशच्या पुढाकाराने चौकात ज्येष्ठ नागरिक आपली सेवा देताना दिसणार आहेत. आज गुरुवारी धरमपेठ येथील ट्रॅफिक पार्कमध्ये आयोजित छोटेखानी कार्यक्रमात उपपोलीस आयुक्त भारत तांगडे यांनी १९ ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त वाहतूक पोलीस अधिकार्याचे प्रमाणपत्र दिले. हे अधिकारी आपल्या सोयीनुसार चौकातील पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्याचे कार्य करणार आहेत. कार्यक्रमाला जनआक्रोशचे अध्यक्ष डॉ. अनिल लद्धड, सचिव रवींद्र कासखेडीकर उपस्थित होते. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. या ज्येष्ठांमध्ये कोणी निवृत्त डॉक्टर, नायब तहसीलदार, अभियंता, कर्मचारी, अधिकारी आदींचाही सहभाग आहे. (प्रतिनिधी)