नागपूर : शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास जागविण्याचे काम अॅग्रो व्हिजनने केले आहे. या प्रदर्शनाला भेट देऊन शेतकऱ्यांनी ज्ञान मिळविले. या ज्ञानाच्या उपयोगातून त्यांनी यशस्वी शेतकरी व्हावे. केवळ परंपरागत शेतीने आता काम चालणार नाही. नवीन तंत्रज्ञान आणि पीक पद्धतीत बदल केल्याशिवाय सध्या पर्याय नाही. त्याचा फायदाही शेतकऱ्यांना अनुभवता येईल, असा मंत्र कृषी प्रदर्शन अॅग्रो व्हिजनचे प्रवर्तक आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांना दिला. रेशीमबाग मैदानावर आयोजित चार दिवसीय कृषी प्रदर्शन अॅग्रो व्हिजनचा समारोप करताना ते बोलत होेते. याप्रसंगी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, माजी खा. दत्ता मेघे, आ. मिलिंद माने, आ. अनिल गोटे, आ. भीमराव घोंडे, आ. किशनराव कथोरे, आयोजक सचिव रवी बोरटकर, रमेश मानकर प्रामुख्याने उपस्थित होते. गडकरी म्हणाले, ग्लोबल आणि लिब्रल इकॉनॉमीत शेतकऱ्यांच्या उत्पादनांना जास्त भाव मिळणे कठीण आहे. कुठलेही सरकार असले तरी ते शेतकऱ्यांना अधिक मूल्य देऊ शकत नाही. शेतकऱ्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करून उत्पादकता वाढविणे गरजेचे आहे. यामुळे उत्पादन खर्च कमी होईल. केवळ सरकार किंवा एखादी योजना शेतकऱ्यांची मदत करू शकत नाही. शेतकऱ्यांना स्वत:च्या भरवशावरच सक्षम व्हावे लागेल. ज्या वर्षी एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, त्या दिवशी मला आनंद आणि समाधान मिळेल. त्यावेळी खऱ्या अर्थाने शेतकरी आत्मनिर्भर झाला असे मी समजील. त्यावेळी अॅग्रो व्हिजनची गरज पडणार नाही. ज्ञानाला संपत्तीत परिवर्तन करण्याची गरज आहे. तंत्रज्ञानाच्या उपयोगातून कृषी क्षेत्रात रोजगाराची निर्मिती होणार आहे. पण त्यासाठी शेतीशिवाय पूरक उद्योगांवरही लक्ष द्यावे लागेल. मत्स्यपालन, डेअरी, पोल्ट्री उद्योग, मधमाशापालन आदी उद्योगवाढ करावी लागेल. याप्रसंगी नागार्जुन कंपनीतर्फे गडकरींनी दत्तक घेतलेल्या पाचगावसाठी ‘सॉईल टेस्टिंग युनिट’ त्यांना प्रदान करण्यात आले. अतिथींचा सत्कार संत्री देऊन करण्यात आला. या प्रदर्शनाला पाच लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी भेट दिली. त्यांच्यासाठी गाड्या पाठविण्यात आल्या नाही. पण शेतकऱ्यांनी पुढाकार घेत प्रदर्शनाला भेट दिली, अशी माहिती गडकरी यांनी दिली. (प्रतिनिधी)‘अॅग्रो व्हिजन’ राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचा समारोप सोमवारी रेशीमबाग मैदानावर झाला. याप्रसंगी अॅग्रो व्हिजनचे प्रवर्तक आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार डॉ. मिलिंद माने, अनिल गोटे, किशन कथोरे, भीमराव घोंडे, ज्येष्ठ नेते दत्ता मेघे, जि.प.च्या अध्यक्षा निशा सावरकर, अॅग्रो व्हिजनच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सी.डी. मायी, संयोजक सचिव रवी बोरटकर, रमेश मानकर, माजी आमदार दादाराव केचे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
अॅग्रो व्हिजनने जागविला शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास
By admin | Updated: December 15, 2015 05:22 IST