नरेश डोंगरे - नागपूर नागपूर : नैनपूर येथून इंदोर जंक्शनकडे ट्रेन नंबर १९३४४ पंचवटी एक्सप्रेस धडधडत जात होती. ट्रेनच्या एका कोचमध्ये प्रवाशांची खचाखच गर्दी होती. कोचच्या एका सिटवर एक अल्पवयीन मुलगी अंग चोरून बसली होती. बाजुचा एक प्रवासी तिच्यावर नजर ठेवून होता. त्याने अचानक एक फोन केला अन् काही वेळेतच आरपीएफचे पथक डब्यात आले अन् तिला ते सोबत घेऊन गेले. पुढच्या घटनाक्रमानंतर तिचे भवितव्य सुरक्षित झाले. रविवारी ही घटना घडली.घरगुती वादविवादाने त्रस्त होऊन सुनीता (नाव काल्पनिक) पंचवटी एक्सप्रेस मध्ये बसली. ती अस्वस्थ असल्याचे तिच्या हालचालीवरून प्रवाशांना जाणवत होते. ती एकटीच असल्याचे एकाने हेरले. त्याने ही माहिती रेल्वे मदत केंद्रात फोन करून दिली. तोपर्यंत गाडी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील बैतूलजवळ आली होती. कंट्रोल रूममधून एकटी मुलगी प्रवास करीत असल्याचे आणि तिला मदतीची गरज असल्याचे कळताच आमला रेल्वे स्थानकावर ही गाडी थांबविण्यात आली. नंतर त्या मुलीला आरपीएफच्या जवानांनी गाडीतून उतरवून घेतले. येथे तिची आस्थेने विचारपूस केली. घरगुती कारणामुळे आपण मागचा पुढचा विचार न करता घर, गाव सोडून जात असल्याचे सुनीताने सांगितले. दरम्यान, आरपीएफने तिच्या पालकांशी संपर्क साधला. अल्पवयीन असल्यामुळे तिची वैद्यकीय तपासणी करून घेण्यात आली. त्यानंतर तिला बैतूल येथील 'वन स्टॉप सेंटर' येथे नेण्यात आले. सुनीताला कायदेशीर प्रक्रिया पार पाडून बालकल्याण समितीसमोर सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर तिचे पालक आल्यानंतर तिला त्यांच्या स्वाधिन करण्यात येईल.वेळीच मदत मिळाल्याने भवितव्य सुरक्षितही अल्पवयीन मुलगी रेल्वे गाडीतील चांगल्या प्रवाशांच्या नजरेस पडली म्हणून तिला तात्काळ मदत मिळाली. ती दुसऱ्या कोणत्या ठिकाणी उतरली असती आणि समाजकंटकांची नजर तिच्यावर पडली असती तर तिचे भवितव्य धोक्यात आले असते. सुदैवाने असे झाले नाही. दरम्यान, कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा अल्पवयीन मुले एकटे दिसल्यास त्वरित आरपीएफ हेल्पलाईन क्रमांक १३९ वर माहिती द्यावी, आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
'ती' ट्रेनमध्ये एकटी असल्याचे पाहून 'त्याने' असे केले की.... एक फोन आला अन् तिचे भवितव्य सुरक्षित झाले
By नरेश डोंगरे | Updated: August 11, 2025 22:35 IST