नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील ‘सीबीएस’मधील (क्रेडीट बेस सिस्टम) ७ पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या चतुर्थ सत्राच्या उन्हाळी परीक्षा अखेर पुढे ढकलण्यात आल्या आहेत. गुरुवारी परीक्षा मंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. आश्चर्याची बाब म्हणजे काही अधिष्ठात्यांचा परीक्षा समोर ढकलण्यासाठी विरोध होता. परंतु नवे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी मात्र विद्यार्थी हिताला महत्त्व दिले असल्याची विद्यापीठात चर्चा होती.नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा दरवर्षीच्या परंपरेला फाटा देत एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातच घेण्यात येत असून केवळ २० दिवसांअगोदर वेळापत्रक घोषित करण्यात आले. १३ एप्रिलपासून या परीक्षांना सुरुवात होणार असल्याने एवढ्या कमी दिवसात परीक्षेची तयारी कशी करावी या चिंतेत विद्यार्थी सापडले होते. विद्यार्थ्यांनी परीक्षा भवनात जोरदार आंदोलन केले. या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, असे निवेदनदेखील देण्यात आले होते. या मुद्यावर अधिष्ठात्यांच्या बैठकीत याबाबत परीक्षा मंडळाने निर्णय घ्यावा असे ठरले. त्यानुसार गुरुवारी परीक्षा मंडळाची तातडीची बैठक बोलविण्यात आली. नवनियुक्त कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांची ही कार्यभार स्वीकारल्यानंतरची पहिलीच बैठक होती. बैठक सुरू होताच प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या निवेदनांच्या आधारे परीक्षा पुढे ढकलण्याबाबतची बाब सदस्यांसमोर ठेवली. ही परीक्षा लवकर घेण्याचे कारण काय अन् वेळापत्रक वेळेवर का जाहीर करण्यात आले याबाबत सदस्यांनी प्रशासनाला विचारणा केली. विद्यार्थ्यांचे तिसऱ्या सत्राचे निकाल उशिरा आले, त्यामुळे त्यांना अभ्यास करण्यास वेळ मिळाला नाही, असे उत्तर अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. अखेर विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता या परीक्षा समोर ढकलण्यात याव्यात याबाबत एकमताने निर्णय घेण्यात आला. नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठाचे प्रभारी परीक्षा नियंत्रक प्रशांत मोहिते यांनी दिली. (प्रतिनिधी)
वेळापत्रकाची ढकलगाडी
By admin | Updated: April 10, 2015 02:12 IST