लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महापालिकेच्या नगररचना विभागात एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. निवासी वापरासाठी लीजवर देण्यात आलेल्या नझूलच्या भूखंडावर बहुमजली वाणिज्यिक आणि रुग्णालयाच्या इमारतींना अनधिकृतरीत्या मंजुरी देण्यात आली आहे. मनपाच्या अभियंत्यांनी संबंधित बिल्डरला विविध लाभ मिळावेत म्हणून भुखंडाचे क्षेत्रफळ कृत्रिमरीत्या वाढवले आणि एफएसआयमध्ये फेरफार केला. ठोस पुरावे आणि कायदेशीर मत उपलब्ध असूनही प्रशासक तथा मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी संबंधित अभियंत्यांना संरक्षण दिले, असा गंभीर आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी केला आहे.
आ. ठाकरे म्हणाले, नझूल विभाग (जिल्हाधिकारी कार्यालय) यांनी १,६२२.९ चौ. मी. क्षेत्रफळाचा नझूल भूखंड (क्रमांक २६/१) धंतोली येथे सुम्भकुटुंबाला त्यांच्या स्वतःच्या निवासी वापरासाठी लीजवर दिला होता. विदर्भातील नामांकित क्रिकेटपटू अशोक भागवत यांनी सुम्भकुटुंबासोबत १,६२२.९ चौ. मी.पैकी ७८९ चौ. मी. क्षेत्रफळ विक्री कराराद्वारे घेतले. त्यांनी १९८८ साली स्पंदन हॉस्पिटलसमोर, भूखंडाच्या पूर्व बाजूला आपल्या ७८९ चौ. मी. क्षेत्रावर निवासी फ्लॅट स्कीम उभारली. महापालिकेच्या नगररचना विभागातील अभियंत्यांनी भूखंडाच्या पश्चिम बाजूला (वर्धा रोडकडे) ३९.५२ मीटर उंचीच्या आठ मजली रुग्णालय व वाणिज्यिक इमारतीच्या बांधकाम नकाशाला २०२१ मध्ये मंजुरी दिली. ही मंजुरी सुम्भ कुटुंबाचे पॉवर ऑफ अटर्नीधारक बिल्डर संजीव शर्मा यांच्या नावे देण्यात आली. अशाप्रकारे एक मोठा घोटाळा करण्यात आला. यानंतर महापालिकेने ज्येष्ठ विधिज्ञ एस. के. मिश्रा यांचे कायदेशीर मत मागवले. त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की, नझूल भूखंड फक्त निवासी वापरासाठीच लीजवर देण्यात आला असल्याने वाणिज्यिक आणि रुग्णालयाच्या इमारतीला मंजुरी देणे हे लीजच्या अटींचे उल्लंघन आहे. मात्र, त्यानंतरही परवानगी देण्यात आली. लेफ्टनंट कर्नल अनंत भागवत हे अशोक भागवत यांचे सुपुत्र असून, त्यांनी २०१४ पासून सातत्याने अनेक तक्रारी दाखल केल्या आहेत, असा आरोप आ. ठाकरे यांनी केला.
चौधरींच्या कार्यकाळातील सर्व मंजुरींची चौकशी करा
भागवत यांनी महापालिकेचे आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे २७ महिन्यांत अनेक तक्रारी केल्या. पण आयुक्तांनी त्याची दखल घेतली नाही. डॉ. अभिजित चौधरी यांच्या नियंत्रणाखाली महापालिकेत घोटाळा सुरू आहे. चौधरी यांच्या कार्यकाळात घेतलेले सर्व निर्णय, दिलेल्या मंजुरींची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी आ. ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
Web Summary : A major scam in Nagpur Municipal Corporation's town planning department is exposed. MLA Vikas Thackeray demands action against engineers and administrators for illegally approving commercial buildings on residential land and protecting the accused.
Web Summary : नागपुर नगर निगम के नगर नियोजन विभाग में एक बड़ा घोटाला सामने आया है। विधायक विकास ठाकरे ने आवासीय भूमि पर अवैध रूप से वाणिज्यिक इमारतों को मंजूरी देने और आरोपियों को बचाने के लिए इंजीनियरों और प्रशासकों के खिलाफ कार्रवाई की मांग की।