नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून देशातील अनेक गणमान्य लोकांनी विविध माध्यमातून शुभेच्छा दिल्या. आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रेणेते श्री श्री रविशंकर यांनी वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला नागपुरातील एका सार्वजनिक कार्यक्रमात त्यांचा अमृतमहोत्सव साजरा केला. यावेळी त्यांनी सरसंघचालकांच्या प्रेरणेतून आतापर्यंत कोट्यवधी तरुण देशकार्याशी जुळले असून भविष्यात ही परंपरा अशीच सुरू राहो असे गौरवोद्गार काढले.
श्री श्री रविशंकर यांनी नंदीची मूर्ती व शाल श्रीफळ देऊन सरसंघचालकांना सन्मानित केले. देशभक्ती व दैवभक्ती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे आणि नागपूर हे देशभक्तीचे केंद्र आहे. सरसंघचालक डॉ.भागवत हे कर्मनिष्ठ आहेत. देश, धर्म, समाजासाठी त्यांनी वेळ व आयुष्य समर्पित केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनात कोट्यवधी लोक देशभक्ती व धर्माच्या स्थापनेसाठी प्रयत्न करत आहेत. संघ देशाच्या संस्कृती व परंपरेला वाचविण्याच्या संकल्पातून शंभर वर्षांपासून कार्य करत आहे व ते यशस्वी झाले आहेत. असेच त्यांचे काम वाढत राहो व त्यांच्या माध्यमातून कोट्यवधी तरुणांना प्रेरणा मिळावी अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
अनेक मान्यवरांचे शुभेच्छा संदेशदरम्यान, वाढदिवसाच्या दिवशी सरसंघचालक नागपुरात संघ मुख्यालयातच होते. संघाच्या अखिल भारतीय अधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्याच. शिवाय देशपातळीवरील अनेक मान्यवरांचे शुभेच्छा संदेशदेखील संघ मुख्यालयात पोहोचले. सरसंघचालकांनी गुरुवारी आदासा येथील गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेतले.