लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फेदेखील प्रतिक्रिया देण्यात आली आहे. भगवा दहशतवाद असे नाव घेत काही लोकांनी राजकीय स्वार्थातून हिंदू धर्माला दहशतवादाशी जोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र न्यायालयाच्या निकालानंतर तो प्रयत्न उघडा पडला असून सत्य समोर आले आहे, अशी भूमिका संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनिल आंबेकर यांनी मांडली आहे. नागपुरात गुरुवारीत ते बोलत होते.
मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह एकूण सातही आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे सत्य उघड झाले आहे. काही लोकांनी आपल्या वैयक्तिक आणि राजकीय स्वार्थासाठी मालेगाव प्रकरणात जाणुनबुजून गुंता तयार केला होता. याप्रकरणात हिंदू धर्म व हिंदू समाजाला दहशतवादाशी जोडण्याचा प्रयत्न झाला होता. प्रदीर्घ न्यायिक प्रक्रिया आणि वस्तुस्थितीच्या आधारे न्यायालयाने सर्व आरोपींना मुक्त करण्याचा निर्णय दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे सर्व आरोप निराधार असल्याचे स्पष्ट झाल्याचे आंबेकर यांनी सांगितले.