कुही : पाेलिसांनी टाकळी शिवारात केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विना राॅयल्टी वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला. त्यात ट्रॅक्टर चालकास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून रेती व ट्रॅक्टर असा एकूण ८ लाख ८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
कुही पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना टाकळी (ता. कुही) शिवारातून रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी या भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यात त्यांना एमएच-४०/सीए-०२६८ क्रमांकाचा ट्रॅक्टर येताना दिसला. संशय आल्याने त्यांनी ट्रॅक्टर थांबवून झडती घेतली. त्या ट्रॅक्टरच्या ट्राॅलीत रेती असल्याचे निदर्शनास येताच कागदपत्रांची तपासणी केली. ती रेती विना राॅयल्टी असल्याचे स्पष्ट हाेताच पाेलिसांनी ट्रॅक्टर चालक धर्मेंद्र परसराम ठाकरे (२६, रा. चंगेरा बेनी, जिल्हा बालाघाट, मध्य प्रदेश) यास अटक केली. त्याच्याकडून ८ लाख रुपयांचा ट्रॅक्टर आणि ८ हजार रुपयांची एक ब्रास रेती असा एकूण ८ लाख ८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी पाेलिसांनी दिली. याप्रकरणी कुही पाेलिसांनी भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक भारत थिटे करीत आहेत.