सरसंघचालक मोहन भागवत : समर्थ रामदासनवमी सुवर्णजयंती उत्सवनागपूर : एकांतात आत्मसाधना करा आणि समष्टीत समाजासाठी काम करा, हा आदर्श समर्थ रामदास स्वामींनी आपल्या आचरणाने दिला. त्यांच्या दासवाणीत त्यांनी ज्ञानाची परीक्षा घेतलेली नाही तर कृतीची, वागण्याची परीक्षा घेतली आहे. क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे, हीच त्यांची शिकवण आहे. आत्मसाधना करताना समाजातले दु:ख, वेदना विसरून चालणार नाही. आत्मसाधनेसोबतच समाजाचे ऋण फेडण्याचाही उपदेश त्यांनी दिला आहे आणि मानवी जीवनाची समृद्धता समता, बंधूता, सेवा यातच आहे, हेही त्यांनी सांगितले. समर्थांच्या उपदेशातून संपूर्ण जगाला मानवी जीवनाचा आदर्श शिकविण्याची जबाबदारी आपली आहे, असे मत रा.स्व.संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी व्यक्त केले. हनुमाननगर सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे समर्थ रामदास नवमी सुवर्णमहोत्सवी उत्सव हनुमाननगरच्या त्रिकोणी मैदानात आयोजित करण्यात आला. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ विचारवंत मा. गो. वैद्य, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, संयोजन समितीचे अध्यक्ष गिरीश हरकरे उपस्थित होते. भागवत म्हणाले, शाश्वत सुखाचा लाभ सर्वांनाच व्हावा म्हणून आपल्या ऋषींनी साधना, तपस्या केली. त्यातूनच हे राष्ट्र तेजस्वी झाले, असे वेद म्हणतात. पण शाश्वत समाधान, आनंद हवा असेल तर मन, शरीर आणि आत्मा यांची शांतता, स्थिरता आवश्यक आहे. विरक्तीशिवाय शाश्वत आनंद मिळत नाही. त्यामुळेच प्रपंच करावा नेटका त्यानंतर परमार्थ साधावा, असे वचन आहे. समर्थही प्रपंचात पडताना सावधान शब्द ऐकून पळून गेले, कारण त्यांनी पूर्वायुष्यात प्रपंच समाधानी केला असला पाहिजे. ही त्यांची साधना होती. प्रपंचातून पळून जाण्याचे समर्थन त्यांनी केले नाही. आपला संघर्ष माणसांशीच होतो. पण इतरांच्या प्रगतीत समाधान मानले तर संघर्ष होत नाही. बंधूतेने इतरांना मदत करणाराच शाश्वत धर्म आहे. हा धर्म पाळल्याशिवाय अर्थ, काम, मोक्ष लाभत नाही. आपल्याला दासवाणी कंठस्थ असते, पण त्याचा अर्थ आणि आचरण कळत नाही. खडतर जीवनातही कसे वागावे, याचा आदर्श दासवाणीत आहे. हे आचरण समाजात कसे वाढेल, याचा प्रयत्न सुवर्ण महोत्सवानिमित्त करावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन मिलिंद जोशी, प्रास्ताविक श्रीराम धोंड यांनी केले. (प्रतिनिधी)
समर्थांचा उपदेश मानवी जीवनाचा आदर्श
By admin | Updated: February 4, 2015 00:57 IST