गरबासाठी पारंपरिक ड्रेसेसची विक्री वाढली; उपराजधानीत दोन कोटींची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2022 09:08 PM2022-09-19T21:08:54+5:302022-09-19T21:10:38+5:30

Nagpur News गरबाकरिता युवक-युवती, महिला-पुरुषांच्या पारंपरिक ड्रेस कोडची मागणी वाढली आहे. व्यवसायाला मिळणारा प्रतिसाद पाहता ड्रेस भाड्याने देणाऱ्यांची संख्याही वाढली आहे.

Sales of traditional dresses for Garba increased; A turnover of two crores in the sub-capital | गरबासाठी पारंपरिक ड्रेसेसची विक्री वाढली; उपराजधानीत दोन कोटींची उलाढाल

गरबासाठी पारंपरिक ड्रेसेसची विक्री वाढली; उपराजधानीत दोन कोटींची उलाढाल

Next
ठळक मुद्देनवरात्रीत भाड्यानेही मिळतात ड्रेसेस१ ते ५ हजारांपर्यंत किंमत

नागपूर : नवरात्रोत्सव दि. २६ सप्टेंबरपासून प्रारंभ होत आहे. या उत्सवाआधीच शहरात गरबाचा रंग चढू लागला आहे. तब्बल दोन वर्षांनंतर सुरू होणाऱ्या या उत्सवात गरबाच्या कार्यशाळा ठिकठिकाणी सुरू झाल्या आहे. अनेकजण पैसे मोजून उत्साहाने प्रॅक्टिस करीत आहेत. यासोबतच गरबाकरिता युवक-युवती, महिला-पुरुषांच्या पारंपरिक ड्रेस कोडची मागणी वाढली आहे. व्यवसायाला मिळणारा प्रतिसाद पाहता ड्रेस किरायाने देणाऱ्यांची संख्याही वाढली आहे.

इतवारी येथील गरबा ड्रेस विक्रेते शैलेश ग्यानी म्हणाले, दोन वर्षांनंतर गरबाचे आयोजन होत असल्यामुळे लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. गरबामध्ये भाग घेण्यास इच्छुक असणाऱ्यांकडून पारंपरिक ड्रेसेसला मागणी वाढली असून, अनेक महिलांनी आधीपासून बुकिंग केली आहे. लेहंगा, बांधणी, डबल घेर लेहंगा, मल्टिलेअर लेहंगा, राजस्थानी, काठियावाडी ड्रेस, गरबा फ्युजन ड्रेस, नववारी साडी, मस्तानी पॅटर्न, कपल ड्रेस, ग्रुप ड्रेस, गुजराती बॉर्डर, कॉम्बो, शॉर्ट, लाँग ड्रेस आदींना मागणी आहे.

दोन कोटींच्या उलाढालीची अपेक्षा

यंदा व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह असून, अनेक व्यापाऱ्यांनी गुजरात, राजस्थान आणि मुंबई येथून मोठ्या प्रमाणात ड्रेसेस विक्रीसाठी मागविले आहेत. नागपुरात तयार होणाऱ्या विशेष पॅटर्नच्या ड्रेसेसला मागणी आहे. आधीच बुकिंग वाढल्यामुळे एकत्रितरीत्या दोन कोटींपेक्षा जास्त उलाढाल होण्याची व्यापाऱ्यांना अपेक्षा आहे. विविध प्रकारच्या ड्रेसेसची किंमत १ ते ५ हजारांपर्यंत आहे. ड्रेसेससोबतच ज्वेलरीलाही मागणी आहे. प्रत्येकजण एका ड्रेससोबत जवळपास ५०० ते हजार रुपयांची ज्वेलरी खरेदी करीत आहे.

गरबा ड्रेसेस आणि ज्वेलरी प्रति दिवसानुसार किरायानेही मिळतात. बेसा येथील माधुरी ठाकरे म्हणाल्या, दर्जा आणि नक्षीकामानुसार एका ड्रेसकरिता ३५० ते ५०० रुपये आकारतो. त्यात बेसिक ज्वेलरीचा समावेश आहे. हा व्यवसाय नऊ दिवसांचा असतो. आधीच बुकिंग झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.

Web Title: Sales of traditional dresses for Garba increased; A turnover of two crores in the sub-capital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.