लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : टिमकी परिसरात ब्रॅंडेडच्या नावाखाली बनावट चप्पल-जोड्यांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. तहसील पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
टिमकीतील तीनखंबा चौकातील युनायटेड फुटवेअर आणि दिल्ली शूज पॉईन्ट येथे मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. या दोन्ही दुकानांमध्ये ‘क्रॉक्स’, ‘नाईके’, ‘जॉर्डन’ या कंपन्यांच्या चपला व जोडे असल्याच्या नावाखाली बनावट वस्तूंची विक्री होत होती. याची माहिती संबंधित कंपन्यांसाठी काम करणाऱ्या युनायटेड कंपनीचे एन्फोर्समेन्ट अधिकारी महेश विष्णू कांबळे (४२, शिवाजीनगर, पुणे) यांना मिळाली. त्यांनी नागपुरात येऊन याची चाचपणी केली. याबाबत त्यांनी तहसील पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन माहिती दिली. पोलिसांनी मंगळवारी या दोन्ही दुकानांवर धाड टाकली. तेथे या कंपन्यांच्या नावाखाली बनावट चपला-जोडे विकले जात असल्याचे आढळले. तेथून पोलिसांनी ८.८० लाखांच्या बनावट चपला-जोडे जप्त करण्यात आल्या. या दुकानांत ब्रॅंडेड कंपन्यांचे नाव असलेले रिकामे बॉक्सदेखील आढळले. पोलिसांनी कांबळे यांच्या तक्रारीवरून जयकुमार नारायणदास थदानी (३५, सिंधी कॉलनी, खामला), कैवल्य किशोर मुजुमदार (३३, कर्वेनगर, वर्धा मार्ग) व मयूर विजय वाघ (३३, तांडापेठ, जुनी वस्ती) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनेक दुकानात दुप्पलचा मालइतवारी, जरीपटका, खामला या भागातील अनेक दुकानांमध्ये ब्रॅंडेडच्या नावाखाली डुप्लिकेट प्रोडक्ट्सची सर्रास विक्री असल्याचे दिसून येते. यात केवळ जोडे-चपलाच नव्हे तर कपडे, घड्याळे, गॉगल्स, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स यांचादेखील समावेश असतो. मात्र याबाबत तक्रारी येत नसल्याने पोलिसांकडूनदेखील बघ्याची भूमिका घेण्यात येते.