नागपूर : नक्षली कारवायाप्रकरणी गुरुवारपासून गडचिरोली सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या न्यायालयात गोकलकोंडा नागा साईबाबा याच्यासह सहा जणांविरुद्ध खटला प्रारंभ होणार होता. परंतु जामिनावर सुटलेला साईबाबा न्यायालयात हजर न झाल्याने विशेष सरकारी वकील पी. के. सत्यनाथन यांनी दाखल केलेला अर्ज न्यायालयाने मंजूर करीत हा खटला २७ आॅक्टोबरपर्यंत तहकूब केला आहे. साक्षीपुरावा नोंदवण्याच्या वेळी न्यायालयात आरोपी हजर असणे आवश्यक आहे. आरोपी हजर नसल्याने सरकार पक्षाने साक्षीपुरावे नोंदवण्याची अनिच्छा व्यक्त केली. खटला तहकूब करण्यात यावा, अशी विनंती सरकार पक्षाने न्यायालयाला केली. दरम्यान अॅड. जगदीश मेश्राम यांनी न्यायालयात अर्ज करून आरोपी प्रशांत सांगलीकर आणि गोकलकोंडा साईबाबा यांना न्यायालयात हजर राहण्यापासून सूट देण्यात यावी, अशी विनंती न्यायालयाला केली. अॅड. समद्दर यांनीही आरोपी विजय तिरकी याला न्यायालयात हजर राहण्यापासून सूट मिळण्यासाठी अर्ज केलेला आहे. आज न्यायालयात महेश तिरकी, पांडू नरोटे आणि हेम मिश्रा हजर होते. न्यायालयात साक्षीदारही साक्ष देण्यासाठी हजर झाले होते. न्यायालयाने आरोपी पक्ष आणि सरकार पक्षाचे म्हणणे ऐकले. आरोपी पक्षाने आरोपींना २७ आॅक्टोबर रोजी न्यायालयात हजर ठेवण्याची हमी घेतली. त्यामुळे न्यायालयाने हा खटला २७ आॅक्टोबरपर्यंत तहकूब केला. (प्रतिनिधी)
साईबाबा न्यायालयात आलाच नाही
By admin | Updated: October 9, 2015 02:53 IST