नंदा खरे यांना ‘उद्या’ या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 10:39 AM2021-03-13T10:39:22+5:302021-03-13T10:40:47+5:30

Nagpur News नागपूरचे प्रसिद्ध कादंबरीकार नंदा खरे उपाख्य अनंत यशवंत खरे यांना त्यांच्या ‘उद्या’ या कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Sahitya Akademi Award for Nanda Khare's novel 'Udya' | नंदा खरे यांना ‘उद्या’ या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार

नंदा खरे यांना ‘उद्या’ या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार

googlenewsNext
ठळक मुद्देमात्र पुरस्कार स्वीकारण्यास कळविला नकारआबा महाजन यांना ‘बाल साहित्य पुरस्कार’

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूरचे प्रसिद्ध कादंबरीकार नंदा खरे उपाख्य अनंत यशवंत खरे यांना त्यांच्या ‘उद्या’ या कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यासोबतच जळगावचे प्रसिद्ध बालसाहित्यिक आबा महाजन यांच्या ‘आबाची गोष्ट’ या लघुकथा संग्रहास साहित्य अकादमीने ‘बाल साहित्य पुरस्कार’ जाहीर केला आहे.

नंदा खरे पेशाने स्थापत्य अभियंते असून, धरणे, पूल, कारखाना बांधणाऱ्या खरे ॲण्ड तारकुंडे या कंत्राटदार कंपनीचे ते भागीदार व व्यवस्थापकीय संचालक होते. ३४-३५ वर्षे व्यावसायिक क्षेत्रात असल्यानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती पत्करली आणि नंतरचा काळ त्यांनी साहित्यविषयक कृतीमध्ये घालविण्याचा निर्णय घेतला. त्यांनी संप्रति, विसशे पन्नास, बखर अनंतकाळाची आदी कादंबरींसोबतच विज्ञानविषयक पुस्तके, भाषांतर, ललित आणि आत्मचरित्रे लिहिली आहेत. त्यांची ‘उद्या’ ही कादंबरी जानेवारी २०१४ मध्ये प्रकाशित झाली. या कादंबरीला मराठी भाषेतील सर्वोत्तम कलाकृती म्हणून २०२० सालचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मात्र, त्यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार कळविला आहे. त्यांच्या या निर्णयाने साहित्य वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यासोबतच आबा महाजन यांच्या ‘आबाची गोष्ट’ या लघुकथासंग्रहास बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. ५० हजार रुपये रोख, ताम्रपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

चार वर्षांपूर्वी मी पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. समाजाकडून मला भरपूर मिळाले आहे. मात्र, यापुढेही घेत राहणे मला इष्ट वाटत नाही. पुरस्कार देणाऱ्या सर्व संस्थांचा आदर राखून व त्यांचे आभार मानून ही माझी भूमिका मी मांडत आहे.

- नंदा खरे, कादंबरीकार

 

Web Title: Sahitya Akademi Award for Nanda Khare's novel 'Udya'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.