नागपूर : हिंगण्यातील राय टाऊन येथे देहव्यापार करताना गुन्हे शाखा पोलिसांच्या जाळ्यात अडकलेल्या रशियन तरुणीसह दोघींची न्यायालयाच्या आदेशान्वये करुणा शासकीय वसतिगृहात रवानगी करण्यात आली. सोमवारी पोलिसांनी देहव्यापारचा अड्डा चालविणारा राजेश रमेश इखार रा. शांतिनगर आणि त्याचा ड्रायव्हर आनंद ज्ञानीराम पंचेश्वर रा. बालाघाट यांना अटक केली होती. तर अड्ड्यावरून रशियन तरुणी आणि मुंबईच्या माटुंगा येथील तरुणीची सोडवणूक करण्यात आली होती. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी या दोन्ही आरोपींना मुख्य न्यायदंडाधिकारी एस.बी. गावंडे यांच्या न्यायालयात हजर करून आरोपींच्या पोलीस कोठडी रिमांडची मागणी केली. न्यायालयाने आरोपींना ८ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा तर दोन्ही तरुणींना करुणा वसतिगृहात ठेवण्याचा आदेश दिला. आरोपींपैकी राजेश इखार हा स्थानिक दलाल आहे. देशभरात देहव्यापाराचे रॅकेट चालविणारा मुंबईचा साजनकुमार नागपुरात इखारच्यामार्फत हा व्यवसाय चालवीत होता. त्याला प्रत्येक ग्राहकामागे एक हजार रुपये मिळत होते. उर्वरित रक्कम साजनकुमारच्या बँक खात्यात जमा होत होती. यापैकी ६० टक्के रक्कम रशियन तरुणीला मिळत होती तर ४० टक्के रक्कम साजनकुमार स्वत: ठेवून घेत होता. आनंद पंचेश्वर हा आपल्या एमएच-डीव्ही-६९०९ क्रमांकाच्या इंडिगो कारने तरुणींना ग्राहकांपर्यंत पोहोचवून देत होता. ही कारही पोलिसांनी जप्त केली आहे. रशियन बाला ही २०१० पासून भारतात असून मोठमोठ्या शहरात ती देहव्यापार करीत होती. ती रशियाच्या पेट्रोजा व्होडस् येथील रहिवासी आहे. नागपुरात ती शनिवारी दाखल झाली होती. (प्रतिनिधी)
रशियन तरुणीसह दोघींची शासकीय वसतिगृहात रवानगी
By admin | Updated: May 6, 2015 02:13 IST