अभय लांजेवार
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : शॉर्ट सर्किटमुळे १० तान्हुल्यांचा हकनाक बळी गेलेल्या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील घटनेनंतर सर्वच कमालीचे हादरून गेले आहेत. या अक्षम्य प्रकारानंतर आता उशिरा का होईना, ग्रामीण रुग्णालयांमध्ये अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती नकोच! यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा नव्याने, जोमाने कामाला लागल्याचे सकारात्मक चित्र दिसून येते. असे असले तरी उशिरा सुचलेले शहाणपण अशाच शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी. व्ही. पातूरकर यांनी याबाबत नागपूर जिल्ह्यातील सर्वच ग्रामीण रुग्णालयांना अलर्ट जारी केल्याची विश्वसनीय माहिती आहे.
नागपूर जिल्ह्यात ग्रामीण रुग्णालयांची संख्या १० आहे. आग शमविण्यासाठी तथा नियंत्रणासाठी अग्निरोधकाची (फायर एक्स्टिंग्विशर) अत्यावश्यक सुविधा प्रत्येक रुग्णालयात स्वतंत्रपणे असावी लागते. या सर्वच रुग्णालयांमध्ये अग्निरोधक असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्याने दिली. एका रुग्णालयात किती अग्निरोधक असावेत, किती अग्निरोधकांची मुदत संपलेल्या अवस्थेत आहे. किती अग्निरोधकांचे रिफीलिंग कधी, केव्हा करण्यात आले. एखादा अनुचित प्रकार झाल्यास अग्निरोधक सज्ज आहेत काय, आदी प्रश्न डॉ. डी.व्ही. पातूरकर यांच्याकडे विचारले असता, मी सध्या मुंबईला आहे. माझ्याकडे तूर्त ही माहिती उपलब्ध नाही, असे म्हणत अधिक बोलण्याचे त्यांनी टाळले. भंडारा अग्निकांड घडल्यानंतरही ग्रामीण रुग्णालयांना केवळ अलर्ट जारी केला जात असेल आणि वास्तविक परिस्थिती धोक्याची असेल तर संपूर्ण ग्रामीण रुग्णालयांचेसुद्धा ऑडिट करावयाची मागणी केली जात आहे.
....
निष्काळजीपणाच!
भंडारा येथील अग्निकांडानंतर आता कुठे संपूर्ण यंत्रणा आणि अधिकारी झोपेतून जागे झाल्याचे दिसून येत आहे. वास्तविकत: अनेक ठिकाणी अग्निरोधक रिकाम्या अवस्थेत तर कुठे एक्सपायरी डेट गेलेल्या अवस्थेत असल्याच्या बाबी समोर येत आहेत. शासन या अत्यावश्यक सेवेसाठी अनुदान उपलब्ध करून देत असले तरी या अनुदानाचा कुठे गैरवापर तर होत नाही ना, याबाबतही चौकशी व्हावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
रूजू होताच घेतली दखल
उमरेडच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक पदाची सूत्रे डॉ. एस.एम. खानम् यांनी स्वीकारली. त्यांच्याकडे यापूर्वी कुही रुग्णालयाचा कारभार होता. अग्निरोधकबाबत आम्ही संपूर्ण माहिती संकलित केल्याचे त्या बोलल्या. रूजू होताच त्यांनी योग्य दखल घेतली असून, उत्तमोत्तम सेवा देण्याकडे माझा कल असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.