काटाेल : तालुक्यासह शहरातील काेराेना संक्रमण राेखण्यासाठी तसेच नागरिकांनी उपाययाेजनांचे पालन करावे म्हणून जनजागृती करण्यासाठी काटाेल पाेलिसांनी गुरुवारी (दि. १५) सायंकाळी काटाेल शहरात रूट मार्च केला. या रूट मार्चमध्ये तीन पाेलीस अधिकारी, ३० कर्मचारी व २९ हाेमगार्ड सहभागी झाले हाेते.
सायंकाळी ६ वाजता पाेलीस ठाण्याच्या आवारातून या रूट मार्चला सुरुवात करण्यात आली. शहरातील दुर्गा चौक, तारबाजार, धंतोली, गळपुरा चौक, पंचवटी, जानकीनगर, काळे चौक, शारदा चौक, शनी चौक, हत्तीखाना, अण्णाभाऊ साठेनगर, पेठबुधवार, आययूडीपी, मेन रोड, धवड पेट्रोलपंप, बस स्थानक चाैक मार्गे हा रूट मार्च ११ किमीचा पायी प्रवास करीत रात्री ८ वाजताच्या सुमारास पाेलीस ठाण्याच्या आवारात परत आला. दरम्यान, पाेलिसांनी पीएस सिस्टीमवरून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, गर्दी करू नये, घराबाहेर पडताना मास्कचा व्यवस्थित व नियमित वापर करा, खरेदी करताना दुकानांसमाेर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करा, अनावश्यक घराबाहेर पडणे व राेडवर फिरणे टाळा यासह अन्य महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. या सूचनांचे गांभीर्याने पालन न केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही पाेलिसांनी दिला.