एकोणवीस गुन्ह्यांची नोंद : सोनसाखळी आणि अंगठी जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चाकूच्या धाकावर साथीदारांसह लुटमार करणारा अट्टल गुन्हेगार रम्मू ऊर्फ अब्दुल रहेमान अब्दुल रजाक (वय ३०) याला पाचपावली पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून सोनसाखळी, अंगठी तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली. कुख्यात रम्मूचे दोन साथीदार फरार आहेत.
कुख्यात रम्मू आणि त्याच्या साथीदारांची शांतीनगर, लकडगंज आणि पाचपावली परिसरात प्रचंड दहशत आहे. चाकूच्या धाकावर लुटमार करणाऱ्या रम्मूविरुद्ध शांतीनगर, लकडगंज आणि पाचपावली पोलिस ठाण्यात तब्बल १९ गुन्हे दाखल आहेत. १२ नोव्हेंबरला दुपारच्या सुमारास भावना तभाने आणि त्यांची आई सरला भोतमांगे या वैशालीनगरमधून जात होत्या. दुपारी ३ च्या सुमारास आरोपी रम्मू आणि त्याच्या दोन साथीदारांनी पाठलाग करून भावना यांच्या दुचाकीसमोर आपली दुचाकी आडवी केली. अचानक आरोपी समोर आल्यामुळे गोंधळलेल्या भावना त्यांच्या आईसह गाडीवरून खाली पडल्या. यानंतर आरोपीने चाकूचा धाक दाखवून भावना यांच्या गळ्यातील सोनसाखळी तसेच सोन्याची अंगठी हिसकावून घेतली आणि शिवीगाळ करत पळून गेले. या गुन्ह्याची तक्रार मिळाल्यानंतर पाचपावली पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीचा शोध सुरू केला. सीसीटीव्हीमध्ये आरोपी लुटमार करताना दिसत असल्याने त्याची शोधाशोध केली. इकडे हा तपास सुरू असतानाच रम्मू आणि साथीदारांनी लकडगंज तसेच शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशाच प्रकारे लुटमार केली होती. त्यामुळे शांतीनगर पोलिसांनी त्याला अटक केली आणि कारागृहात डांबले. मंगळवारी २४ नोव्हेंबरला पाचपावली पोलिसांनी प्रॉडक्शन वॉरन्टच्या आधारे रम्मूला कारागृहातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने लपवून ठेवलेली भावना यांची सोनसाखळी आणि अंगठी पोलिसांच्या हवाली केली. या गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही पोलिसांनी जप्त केली. रम्मू सध्या पीसीआरमध्ये असून त्याच्या दोन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.
ही कामगिरी परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त लोहित मतानी, सहायक आयुक्त परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार किशोर नगराळे, पीएसआय अरविंद शिंदे, हवालदार विजय यादव, भीमराव बांबल, नायक जितेंद्र शर्मा, गणेश ठाकरे आणि विनोद बर्डे यांनी बजावली.