मोबाईल, लॅपटॉप आणि कार हिसकावून नेली : वाठोड्यात गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिल्लीहून कार विकत घेऊन मित्रासोबत हैदराबादला निघालेल्या अभियंत्याला अज्ञात आरोपींनी पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले. जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपींनी दोन मोबाईल, लॅपटॉप तसेच त्यांची एसयूव्ही कार असा ४.१५ लाखांचा मुद्देमाल हिसकावून नेला. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पांढुर्णा गावशिवारात शनिवारी रात्री १०.३० च्या सुमारास ही घटना घडली.
अजय हनुमानायक पानुगोतू (२३) असे तक्रार करणाऱ्या अभियंत्याचे नाव आहे. अजय हैदराबाद येथील आरटीसी क्रॉस रोडवर राहतो. तो चेन्नईतील एका आयटी कंपनीत अभियंता आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कंपनीने त्याला हैदराबादला पाठवून ‘वर्क फ्रॉम होम’ दिले. घरून काम करताना त्याने काही दिवसांपूर्वी ऑनलाईन कार सर्च केली. दिल्ली येथे एक एसयूव्ही कार केवळ चार लाखांत मिळत असल्याचे पाहून त्याने त्या कारचा सौदा केला. चार दिवसांपूर्वी एका मित्रासह दिल्लीला गेला. तेथून त्याने एचआर २९/ एबी ७७२२ क्रमांकाची कार विकत घेतली आणि मित्रासह हैदराबादला परत जायला निघाला. शनिवारी ग्वाल्हेर ते इंदूर दरम्यान त्यांना तीन इसम रस्त्यात भेटले. हैदराबादला जायचे आहे, असे सांगून त्यांनी लिफ्ट मागितली. अजयने त्यांना कारमध्ये बसवून घेतले. शनिवारी रात्री १० च्या सुमारास हे सर्व नागपुरात पोहोचले. हैदराबाद महामार्गावर पांढुर्णा गावाजवळ आरोपींनी अजयला कार थांबवण्यास सांगितले. त्यानंतर त्याला पिस्तूल दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. अजय तसेच त्याच्या मित्राच्या जवळचे मोबाइल हिसकावून घेतले आणि त्यांना जबरदस्तीने कारमधून उतरवून आरोपी कार घेऊन पळून गेले.
या अनपेक्षित घटनेमुळे हादरलेल्या अजय आणि त्याच्या मित्राने रात्री त्या भागातील काही मंडळींना जवळच्या पोलीस ठाण्याचा नंबर विचारला. त्यानंतर वाठोडा पोलीस ठाणे गाठले. तेथे त्यांनी घटनेची माहिती देऊन तक्रार नोंदविली. ठाणेदार आशालता खापरे यांनी लगेच नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून कारचा नंबर आणि आरोपीची माहिती आजूबाजूच्या पोलीस ठाण्यात दिली. रात्रीपासून आरोपींना शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, रविवारी दुपारपर्यंत आरोपी पोलिसांना सापडले नव्हते.
----