आंदोलन सुरूच : मागण्यांची शासनाकडून दखल नाहीनागपूर : आपल्या न्याय्य मागण्यांसाठी विदर्भ विकलांग संघर्ष समितीच्यावतीने विधानभवनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले. परंतु मोर्चाच्या तिसऱ्या दिवशीही अपंग बांधवांच्या मागण्यांबाबत काहीच निर्णय न घेतल्यामुळे संतप्त अपंग बांधवांनी मंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास फाशी देऊन टेकडी मार्गावर रास्तारोको आंदोलन केले.विदर्भ विकलांग संघर्ष समितीच्यावतीने अपंग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोर्चाचे आयोजन केले. पोलिसांनी हा मोर्चा टेकडी मार्गावर रोखून धरला. मोर्चाच्या तिसऱ्या दिवशीही अपंगांच्या मागण्यांबाबत शासनातील एकाही मंत्र्याने दखल न घेतल्यामुळे गुरुवारी अपंग बांधवांचा संयम सुटला. त्यांनी मंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा तयार करून त्याला फाशी दिली. सायंकाळच्या सुमारास टेकडी मार्गावर रास्तारोको आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी दडपशाहीचा वापर करून धक्के देत अपंग बांधवांना बाजूला केले. दरम्यान, मागण्यांची पूर्तता होईपर्यंत आपले आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय विदर्भ विकलांग संघर्ष समितीचे गिरीधर भजभुजे यांनी घेतला आहे. (प्रतिनिधी)
अपंग बांधवांचा रास्तारोको
By admin | Updated: December 11, 2015 03:54 IST