सुमेध वाघमारे नागपूर: महाराष्ट्राच्या वैद्यकीय इतिहासात एक सुवर्णपान जोडले गेले आहे. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (मेडिकल) देशातील पहिल्या रोबोटिक किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेची यशस्वी नोंद झाली आहे. ही कामगिरी केवळ नागपूर किंवा महाराष्ट्रासाठी नव्हे, तर देशभरातील गरजू रुग्णांसाठी एक आशेचा किरण बनली आहे. या ऐतिहासिक यशाने शासकीय रुग्णालयांमध्येही अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुविधाचा फायदा गरीब व सामान्य रुग्णांना होऊ शकतो, हे सिद्ध झाले आहे.
मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी या ऐतिहासिक कामगिरीची माहिती शुक्रवारी पत्रपरिषदेतून दिली. ते म्हणाले, महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांमध्ये सर्वात पहिले रोबोटिक तंत्रज्ञान मेडिकलमध्ये आले आणि आतापर्यंत या तंत्रज्ञानाचा वापर करून २५० हून अधिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या आहेत. विशेष म्हणजे, आतापर्यंत ८९ किडनी ट्रान्सप्लांट झाले आणि हे ९० वे ट्रान्सप्लांट रोबोटिक पद्धतीने यशस्वी करण्यात आले. या यशाने शासकीय रुग्णालयांची प्रतिमा उंचावली असून, भविष्यात अशा अनेक अत्याधुनिक शस्त्रक्रिया सामान्य रुग्णांना उपलब्ध होतील अशी आशा निर्माण झाली आहे.
आईने दिली मुलाला किडनीसुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या युरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. धनंजय सेलुकर यांनी सांगितले, एका ६५ वर्षीय आईने आपल्या ३२ वर्षांच्या मुलाला किडनी दान केली. रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर करून केवळ तीन लहान छिद्रांच्या मदतीने मुलाच्या आईच्या शरीरातून किडनी काढण्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली. विशेष म्हणजे, पूर्वी किडनी दान करणाºया व्यक्तीला शस्त्रक्रियेनंतर साधारणत: सहा ते सात दिवस रुग्णालयात राहावे लागायचे, परंतु रोबोटिक सर्जरीमुळे अवघ्या ४८ तासांत त्या महिलेला डिस्चार्ज देण्यात आला. शिवाय, कमी रक्तस्त्राव, लहान चिरा आणि जलद उपचार यांसारख्या अनेक फायद्यांमुळे रुग्ण लवकर बरा होईल.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेमुळे गरिबांना फायदामहत्त्वाचे म्हणजे, ही शस्त्रक्रिया 'महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजने'अंतर्गत करण्यात आली, त्यामुळे रुग्णाला एकही रुपया खर्च करावा लागला नाही. खासगी रुग्णालयांमध्ये या शस्त्रक्रियेसाठी १० लाखांहून अधिक खर्च येतो. यामुळे ही सुविधा आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असलेल्यांसाठी वरदान ठरल्याचेही डॉ. गजभिये यांनी सांगितले.
वैद्यकीय क्षेत्रातील एक मोठे पाऊलशासकीय रुग्णालयात किडनी ट्रान्सप्लांट प्रक्रियेत पहिल्यांदाच रोबोटचा वापर झाला असून ही ऐतिहासिक कामगिरी वैद्यकीय क्षेत्रातील एक मोठे पाऊल आहे, असे मतही अधिष्ठाता डॉ. गजभिये यांनी व्यक्त केले. ही शस्त्रक्रिया अधिष्ठाता डॉ. गजभिये यांच्या मार्गदर्शनात, मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांच्या पुढाकारात व डॉ. धनंजय सेलुकर यांच्या नेतृत्वात मेडिकलच्या शल्यचिकीत्सा विभागाचे डॉ. भुपेश तिरपुडे, डॉ. हेमंत भानारकर, डॉ. विक्रांत अकोलवार, डॉ. गायत्री देशपांडे, नेफ्रालॉजी विभागातील डॉ. पियूष किमंतकर, डॉ. वंदना आदमने, डॉ. मनोज उमरे, डॉ. स्नेहा लुटे, डॉ. पियू पांचालवार, भूलतज्ज्ञ डॉ. प्रदीप धूमाने, डॉ. मेघा ताजणे, डॉ. एल.एफ . वली, डॉ. योगेश झवर, डॉ. शिल्पा जायस्वाल व अवयव प्रत्यारोपण समन्वयक डॉ. सुमित चाहकर यांनी यशस्वी केली.