नागपूर : चिखली खुर्द येथील निवासी क्षेत्रातील १४० एकर जागेवरील कचरा डेपो व बफर झोनच्या आरक्षणामुळे मोठी समस्या निर्माण झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथील आरक्षण हटविण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. या निर्णयामुळे दक्षिण नागपुरातील १२ हजार लोकांना दिलासा मिळाला असून त्यांना मुख्यमंत्र्यांकडून गणतंत्र दिनाची मोठी भेट दिली मिळाली आहे. चिखली खुर्द येथील आरक्षित जमिनीवर १० ते १२ हजार लोकांनी घरे उभारलेली आहेत. परंतु या जागेवर आरक्षण असल्याने या भागात कोणत्याही स्वरुपाची विकास कामे करता येत नव्हती. नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी येथील आरक्षण हटविण्यासाठी आमदार सुधाकर कोहळे गेल्या काही वर्षापासून प्रयत्नात होते. ही जमीन नासुप्रच्या मालकीची असल्याने त्यांनी विश्वस्त असताना या बाबतचा प्रस्ताव नासुप्रच्या बैठकीत मंजूर करून शासनाकडे पाठविला होता. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली नाही. त्यामुळे या भागातील विकास कामे रखडली होती. या प्रस्तावाला मंजुरी मिळण्यासाठी आमदार कृ ष्णा खोपडे व सुधाकर कोहळे यांनी सोमवारी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आरक्षणामुळे या परिसरात विकास कामे करता येत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आणले. १२ हजार लोकांच्या भवितव्याचा प्रश्न असल्याने त्यांनी या जमिनीवरील आरक्षण हटविण्याला मंजुरी दिली. (प्रतिनिधी)आश्वासनाची पूर्तताकचरा डेपो व बफर झोनच्या आरक्षणामुळे चिखली खुर्द भागातील १२ हजार लोकांना मूलभूत स्वरुपाच्या सुविधा उपलब्ध करताना अडचणी येत होत्या. यासाठी गेल्या काही वर्षापासून पाठपुरावा करीत होतो. विधानसभा निवडणुकीत येथील नागरिकांना आरक्षण हटविण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्र्यांनी आरक्षण हटविल्याने या आश्वासनाची पूर्तता झाल्याचे समाधान आहे. दक्षिण नागपुरातील नागरिकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली ही गणतंत्र दिनाची भेट आहे. सुधाकर कोहळे , आमदार
कचरा डेपोचे आरक्षण हटले
By admin | Updated: January 26, 2016 03:20 IST