मागितला प्रवेश,मिळाल्या लाठ्या!

By Admin | Updated: August 17, 2016 02:05 IST2016-08-17T02:05:23+5:302016-08-17T02:05:23+5:30

उपराजधानीतील शासकीय ‘आयटीआय’मध्ये प्रवेशप्रक्रियेदरम्यान तणाव निर्माण झाला. संतप्त विद्यार्थ्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

Required access, got sticks! | मागितला प्रवेश,मिळाल्या लाठ्या!

मागितला प्रवेश,मिळाल्या लाठ्या!

शासकीय ‘आयटीआय’मध्ये तणाव : विद्यार्थी संतप्त, गैरप्रकार झाल्याचा आरोप
नागपूर : उपराजधानीतील शासकीय ‘आयटीआय’मध्ये प्रवेशप्रक्रियेदरम्यान तणाव निर्माण झाला. संतप्त विद्यार्थ्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. या संपूर्ण प्रकारामुळे ‘आयटीआय’ला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. रात्री उशिरापर्यंत संतप्त विद्यार्थी परिसरात उपस्थित होते.

‘आयटीआय’ची प्रवेशप्रक्रिया चार टप्प्यात घेण्यात आली. हे टप्पे आटोपल्यानंतरदेखील १४९ जागा शिल्लक होत्या. या जागांवर प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ‘एसएमएस’ करण्यात आले. त्यानुसार विद्यार्थी ‘आयटीआय’मध्ये पोहोचले. अनेक विद्यार्थी तर सोमवारी रात्रीपासूनच रांगेमध्ये लागले होते. मंगळवारी सकाळपासूनच विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. शासकीय ‘आयटीआय’मध्ये प्रवेशाची एकच खिडकी होती व विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या वेगवेगळ्या रांगा होत्या. विद्यार्थ्यांचा ‘आॅनलाईन’ अर्ज व कागदपत्रांची पडताळणी करून त्यांना प्रवेशासाठी ‘टोकन’ देण्यात येत होते. यावेळी काही विद्यार्थी व बाहेरील व्यक्ती रांगेत शिरून ‘टोकन’ घेत असल्याचे निदर्शनास आल्यावर विद्यार्थ्यांनी आरडाओरड केली. याचदरम्यान, सर्व जागांवर प्रवेश झाले असून आता ‘टोकन’ देण्यात येणार नाही, असे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी जाब विचारण्यास सुरुवात केली. यावेळी रांगेमध्ये धक्काबुक्कीदेखील सुरू झाली.

कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय नाही
यंदा शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची सोय करण्यात आली आहे. मात्र, सगळ्याच विद्यार्थ्यांना शासकीय ‘आयटीआय’मध्ये प्रवेश हवा आहे. ते देणे शक्य नाही. प्रवेश पूर्ण झाल्याचे विद्यार्थ्यांना कळविण्यात आले. कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय व्हावा, असे आम्हाला वाटत नाही. बुधवारपासून सुरू होणाऱ्या खासगी महाविद्यालयांमध्ये प्रवेशामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल, असे मत शासकीय ‘आयटीआय’चे प्राचार्य प्रदीप लोणारे यांनी व्यक्त केले.

 

Web Title: Required access, got sticks!