हसनबागमध्ये तणाव : दोघांवर प्राणघातक हल्ला नागपूर : हसनबागेतील कुख्यात समशेर टोळीने आज प्रतिस्पर्धी टोळीतील दोघांवर प्राणघातक हल्ला चढवला. त्यात जलील कसाई आणि अक्का हे दोघे गंभीर जखमी झाले. आज रात्री १० च्या सुमारास हसनबागमधील औरंगजेब चौकाजवळ समशेर टोळीतील रज्जू, मुन्नसर आणि साथीदारांनी जलील तसेच अक्काला घेरले. त्यांच्यावर घातक शस्त्रांचे सपासप घाव मारले. त्यामुळे हे दोघेही गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. आरोपी रज्जू कुख्यात समशेरचा भाऊ असल्याचे समजते तर, जखमी जलील आणि अक्का समशेरच्या विरोधी टोळीतील सदस्य आहेत. दोन महिन्यांपूर्वी जलीलचा साथीदार अलिम याच्या टोळीने समशेरचा भाऊ गफ्फार याची गोळ्या झाडून हत्या केली होती. विशेष म्हणजे, आरोपींनी गफ्फारच्या हत्येसाठी प. बंगालमधून शूटर बोलवला होता. नंदनवन पोलिसांनी त्याला दोनच दिवसांपूर्वी अटक केली. इकडे सूडाने पेटलेल्या समशेरच्या टोळीने जलील आणि अक्कावर प्राणघातक हल्ला चढवला. या दोघांचीही प्रकृती गंभीर असून, हसनबागमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)
समशेर टोळीने काढला वचपा
By admin | Updated: June 22, 2014 00:54 IST