- नरेश डोंगरे नागपूर : जैश ए मोहम्मद ने नागपूर सोबतच दिल्लीतही रेकी करून घेतल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. जैश चे हस्तक आणि रईसचे चार साथीदार पुन्हा काश्मीर मध्ये पकडले गेले. त्यांच्याकडून ही माहिती उघड झाल्याचे शिर्षस्थ सूत्रांनी लोकमत ला सांगितले आहे. दरम्यान, येथील संघ मुख्यालयासह विविध संवेदनशील स्थळांच्या रेकी प्रकरणात जैश ए मोहम्मदच्या हस्तकाला जो बंदा मदत करणार होता, तो तपास यंत्रणेच्या टप्प्यात असून त्याच्या मुसक्या कोणत्याही क्षणी आवळल्या जाऊ शकतात, अशीही माहिती शिर्षस्थ सूत्रांकडून मिळाली आहे.
आत्मघाती हल्ल्याच्या इराद्याने जैश ए मोहम्मदचा ऑपरेशन कमांडर उमर याने पाकिस्तानात बसून त्याच्या हस्तकाला नागपुरात पाठविले होते. रईस अहमद असाद उल्ला शेख (२६, अवंतीपुरा, काश्मीर) नामक या हस्तकाकडून उमरने संघ मुख्यालयासह विविध संवेदनशील स्थळाची रेकी करून घेतली. तत्पूर्वी 'नागपुरात पोहोचल्या बरोबर तुला एक 'बंदा' भेटेल आणि तो सगळ्या प्रकारची मदत करेल', असे उमरने रईसला सांगितले होते. 'हा बंदा कोण आहे, नागपूरचा की नागपूरच्या बाहेरचा', ते अद्याप स्पष्ट झाले नाही.
चौकशी प्रदीर्घ चालणार
नागपूर सोबतच दिल्लीतही रेकी करण्यात आल्याचे आता स्पष्ट झाल्याने हे प्रकरण अत्यंत गँभीर बनले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी आणखी अनेक दिवस सुरू राहणार आहे. स्थानिक पोलिस, दिल्ली एटीएस, एनआयए, गुप्तचर संस्था एकमेकांशी समन्वय ठेवून रेकी प्रकरणाचा तपास करीत आहेत.