नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने सोमवारी केंद्र सरकारला प्रस्ताव सादर करून नागपूर येथील ॲड. सुशील मनोहर घोडेस्वार यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची शिफारस केली. केंद्र सरकारने ही शिफारस मंजूर केल्यानंतर ॲड. घोडेस्वार न्यायमूर्तीपदी नियुक्त होतील.
मुंबई ॲड. घोडेस्वार हे उच्च न्यायालयाचे निवृत्त प्रभारी मुख्य न्यायमूर्ती मनोहर घोडेस्वार यांचे सुपुत्र होत. तसेच, काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामधून दिल्ली उच्च न्यायालयामध्ये बदली झालेले न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील माजी मुख्य सरकारी वकील ॲड. दिनकर कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. घोडेस्वार यांनी नागपूर येथे सुरुवातीच्या काळात वकिली व्यवसाय केला. त्यानंतर ते स्वतंत्रपणे वकिली करायला लागले. ते सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये सहायक सरकारी वकीलपदी कार्यरत असून ही जबाबदारी २०१३ पासून यशस्वीपणे सांभाळत आहेत.
दरम्यान, त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये राज्य सरकारला विजय मिळवून दिला. त्यांना संवैधानिक, दिवाणी, फौजदारी, महसूल इत्यादी प्रकरणे हाताळण्याचा सखोल अनुभव आहे. ते मूळचे अमरावतीकर असून त्यांनी १९९८ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयामधून कायद्याची पदवी प्राप्त केली आहे. त्यांची आतापर्यतची यशस्वी कारकीर्द लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने त्यांना न्यायमूर्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.