लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील रेशन दुकान वाटपातील गैरव्यवहाराचा तपासासाठी सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय चौकशी समितीची स्थापना करण्यात आली होती. बराच कालावधी लोटल्यावर चौकशी पूर्ण करून अहवाल सहायक जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला. मात्र, यावर अधिकाऱ्यांनी मौन धारण केले आहे.
'लोकमत'ने या विषयावर सातत्याने बातम्या प्रसिद्ध केल्यानंतर विभागीय आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार चौकशी करण्यात आली. परंतु, अहवाल जाहीर केला नाही. हा अहवाल दडपण्याचा प्रयत्न असल्याचा रेशन क्षेत्रातील संघटनांचा आरोप आहे. याबाबत ३ जून २०२५ रोजी स्मरण पत्र पाठवण्यात आले. त्यानंतर चौकशी समितीने काम सुरू केले. दरम्यान, समिती अध्यक्ष रजेवर गेल्याने अहवालावर स्वाक्षरी झाली नाही आणि अहवाल रखडला. नंतर अतिरिक्त कार्यभार पाहणाऱ्या अधिकाऱ्यांनी उपायुक्तांकडे अहवाल पाठवला, मात्र त्यावर कार्यवाही करण्याऐवजी मार्गदर्शन मागवले.
उपायुक्तही मौन का?या प्रकरणावर 'लोकमत'ने अन्न व नागरी पुरवठा विभागाचे उपायुक्त यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. अहवालावर पुढील कार्यवाही झाली आहे का? अशी विचारणा केली. मात्र, उपायुक्तांकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
तस्कराला वाचवण्याचा प्रयत्नरेशन विभागात गरिबांसाठी असलेल्या धान्याचा सर्रास काळाबाजार सुरू आहे. हिरवी ले-आउट येथील एका धान्य तस्कराची गाडी महाल झोनमधील विभागीय पथकाने पकडली होती. मात्र, ही गाडी नंतर गायब झाली. सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. संबंधित तस्कराला वाचवण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. तस्कर काही नेत्यांचा निकटवर्तीय असून, काही अधिकाऱ्यांशीही त्याचे चांगले संबंध आहेत. त्याची चौकशी झाली तर गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे.