- क्षितिजा देशमुख, नागपूरमानवी शरीरातील प्रत्येक अवयवाची रचना आणि जागा निश्चित असते. हृदय नेहमी शरीराच्या डाव्या बाजूला असते, हे सर्वश्रुत आहे. मात्र नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील एका ७० वर्षीय महिलेमध्ये याला अपवाद ठरणारी अत्यंत दुर्मिळ जन्मजात अवस्था आढळून आली असून त्यांचे हृदय उजव्या बाजूला असल्याचे निदान झाले आहे. ही घटना नागपूरच्या लता मंगेशकर रुग्णालयात उपचारादरम्यान उघडकीस आली.
संबंधित महिलेला काही दिवसांपासून छातीत दुखणे आणि श्वासोच्छवासाचा त्रास जाणवत होता. प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासणीत ईसीजी काढण्यात आला असता हृदयाशी संबंधित गंभीर बदल आढळून आले.
तपासणीत डॉक्टरांनाही आश्चर्य
हृदयरोग तज्ञ डॉ. हितेंद्र भागवतकर यांनी रुग्णाची सखोल तपासणी सुरू केली. इको तपासणीदरम्यान हृदय नेहमीच्या ठिकाणी न दिसल्याने डॉक्टरांना संशय आला. पुढील तपासणीत महिलांचे हृदय उजव्या बाजूस असल्याची खात्री झाली. ही बाब वैद्यकीय दृष्टिकोनातून अत्यंत दुर्मिळ मानली जाते.
भारतातील एकमेव केस असण्याची शक्यता
डॉक्टरांच्या मते ही जन्मजात अवस्था असून भारतात अशी केस क्वचितच आढळते. विशेष म्हणजे ७० वर्षांचे आयुष्य सामान्यपणे जगल्यानंतर प्रथमच ही अवस्था निदर्शनास येणे हे अधिकच आश्चर्यकारक आहे. जगात अशा केसेस मोजक्याच असून ही तिसरी किंवा चौथी केस असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
हृदयाच्या रक्तवाहिन्यांची रचना पूर्णपणे उलट
या दुर्मिळ निदानानंतर रुग्णावर तातडीने अँजिओग्राफी करण्यात आली. हृदयाची संपूर्ण रचना उलट असल्याने उपचार प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची होती. सर्व रक्तवाहिन्या उलट दिशेने असल्याचे आढळून आले. तपासणीत हृदयाच्या मुख्य रक्तवाहिनीत (LAD) तब्बल ९० टक्के अडथळा असल्याचे स्पष्ट झाले.
अवघड अँजिओप्लास्टित यश
सर्व धोके लक्षात घेऊन अनुभवी डॉक्टरांच्या चमूने अत्यंत काळजीपूर्वक अँजिओप्लास्टी केली. कठीण परिस्थितीतही उपचार यशस्वी ठरले. सध्या रुग्ण महिलेची प्रकृती स्थिर असून कोणतीही गुंतागुंत न होता त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
वैद्यकीय चमूचे कौतुक
हा दुर्मिळ आणि आव्हानात्मक केस यशस्वीरित्या हाताळल्याबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष आमदार डॉ. आशिषराव देशमुख, एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, उपअधिष्ठाता व वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन देवस्थळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनुज तिवारी, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सुश्रुत फुलारे यांनी हृदयरोग विभागाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे.
“हृदय आणि रक्तवाहिन्यांची रचना पूर्णपणे उलट असल्यामुळे ही केस अत्यंत आव्हानात्मक होती. योग्य नियोजन आणि टीमवर्कमुळे रुग्णावर यशस्वी उपचार करता आले", असे डॉ. हितेंद्र भागवतकर (हृदयरोग तज्ञ) यांनी सांगितले.
Web Summary : Nagpur doctors successfully treated a 70-year-old woman with a rare condition where her heart was on the right side. She was admitted to Lata Mangeshkar Hospital with chest pain. Doctors discovered blocked arteries and performed a successful angioplasty, highlighting the complexity and success of the procedure.
Web Summary : नागपुर के डॉक्टरों ने 70 वर्षीय महिला का दुर्लभ स्थिति में सफल इलाज किया, जिसमें उसका हृदय दाईं ओर था। छाती में दर्द के साथ उसे लता मंगेशकर अस्पताल में भर्ती कराया गया। डॉक्टरों ने अवरुद्ध धमनियों का पता लगाया और एंजियोप्लास्टी की।