प्रवाशांना मनस्ताप : अस्वच्छ बेडरोल पुरविण्यात येत असल्याचा आरोपनागपूर : राजधानी एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना पुरविण्यात येणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या भोजनामुळे प्रवाशांना मनस्ताप होत असून रेल्वे प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन संबंधित कॅटरर्सवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.प्रवाशांना दर्जेदार भोजन पुरविण्यासाठी रेल्वेने खासगी कॅटरर्सला कंत्राट दिले आहे. परंतु राजधानी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना या भोजनाचा अतिशय वाईट अनुभव येत आहे. १४ मार्चला पत्रकार प्रमोद खोपे, ए. पी. उदय, कपिल कुमार, हेमलता गभणे हे १२४४२ नवी दिल्ली-बिलासपूर राजधानी एक्स्प्रेसच्या कोच क्रमांक ए-६ ने दिल्ली ते नागपूर असा प्रवास करीत होते. त्यांना नॉनव्हेजचे पार्सल पुरविण्यात आले. या पार्सलची सडलेल्या भोजनासारखी दुर्गंधी येत होती. त्यांनी त्वरित गाडीतील टीटीई संजीव राय यांना कळविले. टीटीईने भोजनाची तक्रार धुन कॅटरर्सचे व्यवस्थापक दिलीप सिंग यांना केली. त्यांनी भोजनाचे पॅकेट मागवून तपासणी केली असता भोजनाची दुर्गंधी येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तक्रारकर्त्यांसमोर भोजन वाईट असल्याचे कबूलही केले. त्यानंतर १० मे रोजी १२४२५ नवी दिल्ली-जम्मू राजधानी एक्स्प्रेसमध्ये १० मे रोजी प्रवाशांना निकृष्ट भोजन पुरविण्यात आले. त्यामुळे धुन कॅटरर्स प्रवाशांना निकृष्ट भोजन पुरवून त्यांच्या आरोग्याशी खेळ करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. रेल्वे प्रशासनाने यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी प्रमोद खोपे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
राजधानीत निकृष्ट भोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2016 03:10 IST