Raped on minor girl in Nagpur | नागपुरात सव्वाचार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार
नागपुरात सव्वाचार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार

ठळक मुद्देआरोपी गजाआड : अंबाझरीतील संतापजनक घटना

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : सव्वाचार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अंबाझरी पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे परिसरात संताप निर्माण झाला आहे. समीर मुनीर शेख (वय ३०) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
आरोपी समीर आणि पीडित मुलीचा परिवार अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आजूबाजूला राहतो. आरोपी काहीसा मनोरुग्णासारखा वागतो. त्यामुळे लग्नाच्या काही दिवसानंतर त्याची पत्नी त्याला सोडून गेली. सध्या तो त्याची आई आणि एका गतिमंद भावासोबत राहतो. पीडित मुलीला तो आपल्या घरी कार्टून बघण्याच्या बहाण्याने नेत होता. मुलगी केवळ चार वर्षे तीन महिने वयाची आहे. त्यामुळे तिच्या आईला कधीच संशय आला नाही. १ मे रोजी आरोपी समीरने तिला घरी नेले. परत आल्याच्या दोन दिवसांनंतर मुलीला वेदना होऊ लागल्याने आईने तिला विचारणा केली. अंघोळीच्या वेळी पाहणी केली असता आईला संशय आला. चिमुकलीला विचारणा केली असता तिने आरोपी समीरच्या पापाची संकेतातून वाच्यता केली. त्यामुळे आईने नराधम समीरला विचारणा केली. यावेळी त्याने याबाबत कुठे वाच्यता केल्यास तुला आणि तुझ्या दोन्ही मुलांना ठार मारेन, अशी धमकी दिली. त्यामुळे भीतीने महिला गप्प बसली. बुधवारी सायंकाळी आरोपीने पुन्हा मुलीला सोबत नेण्याचा प्रयत्न केला. त्यावरून आईने त्याला विरोध केला असता त्याने मुलीच्या आईला अश्लील शिवीगाळ केली. आरडाओरड ऐकून शेजारी गोळा झाले. त्यांना महिलेने घडलेला प्रकार सांगितला. आजूबाजूच्यांनी धीर देऊन पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे शुक्रवारी पीडित महिलेने तक्रार नोंदविली. अंबाझरीतील पोलीस उपनिरीक्षक एस. एस. ठाकरे यांनी गुन्हा दाखल केला.
पाच दिवसांचा पीसीआर
पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. महिला पोलीस उपनिरीक्षक शेख यांनी लगेच धावपळ करून आरोपी समीर शेखला अटक केली. त्याला न्यायालयात हजर करून त्याची पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळविली. पुढील चौकशी सुरू आहे.


Web Title: Raped on minor girl in Nagpur
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.