नागपूर : एसटी महामंडळाच्या शिवशाहीपासून लांबच्या प्रवासासाठी धावणाऱ्या लक्झरी बसेस आज दिसतात. पण ७०-८० वर्षापूर्वी प्रवासी वाहने कशी हाेती, याची कल्पना तुम्ही केलीय का? वयाेवृद्ध झालेल्यांनी कदाचित त्यात सफर केला, पण प्राैढ व तरुणांसाठी ते ‘गुजरे जमाने की बात’ झाली आहे. नागपुरात एल. एन. गुप्ता यांनी १९४२ साली पहिल्यांदा प्रवासी सेवा सुरू केली हाेती. ही गाडी नागपूर ते हिंगणा धावायची. त्या काळात या वाहतुकीला ‘लंदफंद सर्व्हिस’ म्हटले जायचे. ही प्रवासी सेवा देणारी जवळपास ९० वर्षे जुनी गाडीने रविवारी तरुणांचेही लक्ष वेधून घेतले.
रमन विज्ञान केंद्र व तारामंडळात रविवारपासून ‘सेंट इन व्हिन्टेज असाेसिएशन’तर्फे व्हिन्टेज कार व माेटर सायकल प्रदर्शनाला सुरुवात झाली. याच प्रदर्शनात ही गाडी आहे. लंदफंद सेवा देणाऱ्या गाडीला गुप्ता कुटुंबियांनी ‘राजमाता’ असे नाव दिले आहे. एल. एन. यांचा मुलगा राजेश व त्यानंतर नातू लक्ष्मण गुप्ता यांनी या गाडीला जाेपासले आहे. गुप्ता कुटुंबियांच्या संग्रहात ८० वर्षे जुनी हार्ले डेविडसन माेटरसायकलही आहे.
या प्रदर्शनात अशा शंभर, सव्वाशे वर्षे जुन्या जवळपास ७० वाहनांचा थाट भारी ठरला. सेंट्रल प्राेव्हिन्सियल ते बाॅम्बे स्टेटच्या नंबर प्लेट असलेल्या ब्रिटीश कंपनीच्या सन बिम सिंगर, ऑस्टीन, फाेर्ड अल्टीस, डाॅज किंग्सवे आणि दुसऱ्या महायुद्धात वापरलेल्या जीप्स आहेत. जुने चित्रपट अभिनेते वापरत असलेल्या या कार्स आहेत. यासह सर डि. लक्ष्मीनारायण यांचा दत्तक मुलगा वापरत असलेली भारतीय बनावटीची हिंदूस्थान ही कारही लक्ष वेधणारी आहे. याशिवाय ब्रिटीश सैन्यातील डिस्पॅच रायडर चालवित असलेली माेटरसायकल, राजदूत, बजाजची चेतक, लॅम्ब्रेडा, पेट्राेल संपल्यावर पायडलनेही चालणारी माेपेड, लुना ते २००५ पर्यंतचे बाईक्सचे माॅडेल प्रदर्शनात लक्ष वेधून घेत आहेत.
सांभाळणे साेपे नाही, इथेनाॅल मुक्त इंधन हवे
असाेसिएशनचे रंजन चटर्जी यांनी सांगितले, या व्हिन्टेज वाहनांना जाेपासणे साेपे नाही. या वाहनांचे एकएक भाग कमजाेर झाले आहेत. ते मिळत नाही. तरीही त्यांना आठवड्यात एकदा रपेटसाठी काढावे लागते. इथेनाॅलयुक्त पेट्राेलमुळे त्यांच्या इंजिन व इतर पार्ट्सला हानी हाेते. सरकारला या वाहनांसाठी इथेनाॅलमुक्त पेट्राेलची मागणी केली हाेती, पण आमान्य झाल्याचे चटर्जी यांनी सांगितले.
गाड्यांच्या किंमती चारपटव्हिंटेज माेटरसायकलची किंमत भाव खाणारी आहे. त्या काळी १० ते २०-३० हजार रुपयांना घेतलेल्या या गाड्या आज सव्वा ते दाेन लाखाना विकल्या जातात. लाेक आपल्या घरचा वारसा म्हणून त्या जाेपासून ठेवतात. त्यामुळे सहज मिळत नाही. चारचाकी वाहनांना एवढी किंमत मिळत नसली तरी त्यांचीही आवड माेठी आहे. नागपूर शहरात अशा १५० च्यावर वारसा गाड्या असल्याचे रंजन चटर्जी यांनी सांगितले.