लक्षणे नसलेल्यांचे आता घरीच विलगीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 10:04 PM2020-07-27T22:04:35+5:302020-07-27T22:05:47+5:30

‘कोरोना’ रुग्णांची वाढती संख्या आणि उपलब्ध संसाधनांची मर्यादा लक्षात घेता, यापुढे लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरीच विलगीकरणात राहावे लागणार आहे. यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ७ जुलै रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार महापालिकेने स्थानिक स्तरावर मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.

Quarantine of those without symptoms now at home | लक्षणे नसलेल्यांचे आता घरीच विलगीकरण

लक्षणे नसलेल्यांचे आता घरीच विलगीकरण

Next
ठळक मुद्देआरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी : रोगप्रतिकारक क्षमता नसलेले रुग्ण पात्र नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’ रुग्णांची वाढती संख्या आणि उपलब्ध संसाधनांची मर्यादा लक्षात घेता, यापुढे लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरीच विलगीकरणात राहावे लागणार आहे. यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ७ जुलै रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार महापालिकेने स्थानिक स्तरावर मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्रचलित मार्गदर्शक सूचनांनुसार, प्रतिबंधित कालावधीमध्ये रुग्णांना वैद्यकीयदृष्ट्या लक्षणांनुसार लक्षणे नसलेले, सौम्य वा अतिसौम्य लक्षणे, मध्यम तीव्र लक्षणे व तीव्र अशा तीन लक्षणांमध्ये वर्गीकृत केले आहे. त्यानुसार रुग्णांना अनुक्रमे ‘कोविड केअर सेंटर’, ‘डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर’ आणि ‘डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल’ येथे दाखल करावयाचे आहे. मात्र यापुढे लक्षणे नसलेल्या ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांना जर त्यांच्या घरामध्ये योग्यप्रकारे सुविधा उपलब्ध असतील तर त्यांच्या संमतीनुसार घरी विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

काय आहेत मार्गदर्शक सूचना?
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णास लक्षणे नसल्याबद्दल वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित केलेले असावे.
संबंधित रुग्णाच्या घरी अलगीकरणासाठी योग्य सोयीसुविधा उपलब्ध असाव्यात.
गंभीर आजार असलेले व ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेले गृह विलगीकरणाकरिता पात्र राहणार नाहीत.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार काळजीवाहू व्यक्ती व सर्व निकट संपर्कातील व्यक्तींनी प्रोटोकॉलनुसार ‘हायड्रोक्सिक्लोरोक्वीन’ची मात्रा घ्यावी लागेल.
मोबाईलवर आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करावे व ते सतत ‘अ‍ॅक्टिव्ह’ असेल याविषयी दक्ष राहावे.
रुग्णांना स्वत:चे गृह विलगीकरण करण्याविषयी प्रतिज्ञापत्र भरून द्यावे लागेल.
उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी गृह विलगीकरणासाठी अनुमती देण्यापूर्वी तपासणी करावी.
निकटवर्तीयांना घरी करावयाच्या अलगीकरणासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचनाhttps://www.mofhw.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

गृह विलगीकरण कधीपर्यंत राहील?
गृह विलगीकरणाखाली ठेवलेल्या व्यक्तीला लक्षणे सुरू झाल्यानंतर १० दिवसांनी आणि तीन दिवस ताप नसल्यास गृह विलगीकरणातून मुक्त करण्यात येईल. त्यानंतर रुग्णाला पुढील सात दिवस गृह विलगीकरणात राहण्याबद्दल व प्रकृतीचे स्वपरीक्षण करण्याबद्दल सल्ला देण्यात येईल. गृह विलगीकरणाचा काळ संपल्यानंतर परत कोविड-१९ साठी चाचणी करण्याची आवश्यकता नाही.

वैद्यकीय मदत कधी घ्यावी?
गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णाने स्वत: व काळजीवाहू व्यक्तींनी त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवावे. धाप लागणे, श्वासोच्छ्वासास अडथळा निर्माण होणे, ‘आॅक्सिजन सॅच्युरेशन’मध्ये कमतरता येणे, छातीमध्ये सतत दुखणे, वेदना होणे, संभ्रमावस्था, शुद्ध हरपणे, अस्पष्ट वाचा होणे, झटके येणे, हात किंवा पायामध्ये कमजोरी किंवा बधिरता येणे, ओठ, चेहरा निळसर पडणे आदी गंभीर लक्षणे आढळल्यावर त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी.

आरोग्य यंत्रणेची जबाबदारी
गृह विलगीकरणासंदर्भात आरोग्य यंत्रणेची जबाबदारीही स्पष्टपणे नमूद केलेली आहे. मनपाच्या आरोग्य यंत्रणा सर्व रुग्णांचे संनियंत्रण करेल. विलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीचे संनियंत्रण कार्यक्षेत्रातील सर्वेक्षण चमू प्रत्यक्ष भेटीद्वारे करेल. कॉलसेंटरद्वारे त्याचा पाठपुरावा करेल. रुग्णांच्या प्रकृतीची नोंद कार्यक्षेत्रातील आरोग्य कर्मचारी, कॉलसेंटरमधील कर्मचारी ठेवतील. या रुग्णांची माहिती कोविड-१९ पोर्टल व फॅसिलीट अ‍ॅप यावर टाकण्यात येईल. वरिष्ठ अधिकारी याचे संनियंत्रण करतील.

Web Title: Quarantine of those without symptoms now at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.