सुमेध वाघमारे
नागपूर : कोरोनाची भीती आणि चिंतेमुळे मानसिक आजाराच्या रुग्णांत जवळपास २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यातच ज्यांना आधीपासून मानसिक समस्या होत्या, त्यांच्या लक्षणांमध्ये वाढ झाल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे, असे असताना प्रादेशिक मनोरुग्णालयात कोरोना काळात रुग्णांची संख्या ४२ टक्क्यांपेक्षा कमी झाल्याचे चित्र आहे. २०१९मध्ये बाह्यरुग्ण विभागातून ५४०, तर २३५ जुन्या रुग्णांना भरती करण्यात आले होते. २०२०मध्ये कोरोनामुळे रुग्णसंख्या वाढणे अपेक्षित असताना बाह्यरुग्ण विभागातून २३१, तर ५३ जुन्या रुग्णांना भरती करण्यात आले. ९०० खाटांची मंजुरी असलेल्या या रुग्णालयात सध्या अर्धेच रुग्ण, ४५६ रुग्ण उपचार घेत आहेत.
आयुष्यात असंख्य ताणतणाव असतात. त्यांचे नियोजन करणे गरजेचे असते. मनात निर्माण झालेले हे तणाव साचत गेले की, त्याचे रुपांतर चिंता, काळजी, अस्वस्थता यात होते. कोरोनामुळे काहींचे व्यवसाय, नोकरी, मिळकत, बचत, मूलभूत संसाधने गमाविण्याची वेळ आली. काहींना या गोष्टी गमाविण्याची भीती वाटली. याचा मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम झाला. ‘डिप्रेशन’ म्हणजेच नैराश्य या मानसिक आजाराच्या विळख्यात अनेक जण सापडले. मात्र, मुळात हा आजार म्हणून पाहण्याची मानसिकताच नसल्याने अनेक रुग्ण रुग्णालयातच गेलेच नाहीत. आजार अधिक गंभीर झाल्यानंतर रुग्णालयात पोहोचले. हे वास्तव असले तरी प्रादेशिक मनोरुग्णालयातील भरती झालेल्या रुग्णांची आकडेवारी वेगळेच सांगत असल्याचे चित्र आहे.
-आत्महत्या प्रतिबंधक कार्यक्रमालाही प्रतिसाद नाही
कोरोनामुळे जास्तीत जास्त वेळ घरातच जात असल्याने छोट्या छोट्या गोष्टींवरून कुटुंबामध्ये वादाचे प्रसंग वाढले. यातूनच आलेल्या नैराश्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या घटनाही वाढल्या. विशेष म्हणजे, आत्महत्येचे विचार येणे किंवा प्रयत्न करणाऱ्या रुग्णांसाठी प्रादेशिक मनोरुग्णालयात आत्महत्या प्रतिबंधक कार्यक्रम राबविला जातो. परंतु कोरोना काळात अशा रुग्णांची संख्याही रोडावल्याचे चित्र आहे.
-रुग्ण भरतीवरच शंका
१९८७च्या कायद्यानुसार न्यायालयाच्या आदेशानंतरच प्रादेशिक मनोरुग्णालयात रुग्णांना भरती केली जात होते. यामुळे रुग्णालयासाठी दाखल करून घेणे बंधनकारक होते. आता नव्या कायद्यानुसार रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञावरच रुग्ण भरतीची जबाबदारी आली आहे. परंतु कमी भरतीमुळे यावरही शंका उपस्थित केली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे, भरतीपूर्वी रुग्णाची कोरोना चाचणी करण्याची अट आहे. यामुळेही रुग्णांची संख्या कमी झाली असावी, असेही बोलले जात आहे.
-कोट...
लॉकडाऊनच्या काळात दळणवळण साधनांचा अभाव होता. यातच कोरोनाची लागण होण्याची भीती होती. यामुळे प्रादेशिक मनोरुग्णालयातच नव्हे; तर इतरही रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या कमी झाली होती. परंतु आता पुन्हा रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. रुग्ण भरतीच्या प्रक्रियेत कुठलीही टाळटाळ होत नाही. गंभीर रुग्णांना भरती करून घेतले जात आहे.
- डॉ. पुरुषोत्तम मडावी
वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय
::वर्षे नवे भरतीजुने भरती
२०१९ ५४० २३५
२०२० २३१ ५३
::सध्या उपचार घेत असलेले रुग्ण-४५६