दरवर्षी डिसेंबरअखेर आणि जानेवारी महिन्यात मोठ्या संख्येने दिसणारे पाहुणे पक्षी यंदा त्यातुलनेत कमी दिसत असल्याचे पक्षी अभ्यासकांच्या निरीक्षणातून पुढे आले आहे.
लांबलेल्या पावसामुळे पाहुण्या पक्ष्यांची संख्या रोडावली
ठळक मुद्देनियमित निरीक्षणांचा अभाव : दक्षिणेकडील पावसावर स्थलांतराचे प्रमाण
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यंदा महाराष्ट्रासह देशात पावसाळा अधिकच लांबला. त्याचा परिणाम पाहुुण्या पक्ष्यांच्या आगमनावर झाल्याचे दिसत आहे. दरवर्षी डिसेंबरअखेर आणि जानेवारी महिन्यात मोठ्या संख्येने दिसणारे पाहुणे पक्षी यंदा त्यातुलनेत कमी दिसत असल्याचे पक्षी अभ्यासकांच्या निरीक्षणातून पुढे आले आहे. यंदा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला. पावसाळा संपल्यावरही तो लांबत राहिल्याने राज्यातील वातावरण संमिश्र राहिले आहे. महाराष्ट्रासोबतच राजस्थान, गुजरातमध्येही बराच पाऊस पडल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली. साधारणत: दक्षिणेकडे पाऊस कमी पडला किंवा तलाव लवकर कोरडे पडले, तर विदर्भात येणाऱ्या पाहुण्या पक्ष्यांची संख्या वाढते, हा पूर्वाभ्यास आहे. या अनुभवाचा विचार करता यंदा दक्षिणेकडे बराच पाऊस झाल्याने स्थलांतरित पक्षी येणे लांबल्याचे कारण व्यक्त होत आहे.पक्षी अभ्यासकांच्या मते, थंडी कमी पडण्याचा आणि स्थलांतरित पक्ष्यांचा काहीच संबंध नसतो. शून्य अंशाखालील तापमानातही ते हिमालय ओलांडून पिलांसह आलेले असतात. थंडीमुळे त्यांचे आमगन लांबू शकत नाही.पक्षी अभ्यासकांच्या नोंदीनुसार, नागपूर परिसरात माळपठार, जंगल आणि पाण्याच्या काठावरील मिळून ३५ ते ४० टक्के पक्षी स्थलांतरित आहेत. नागपूर परिसरातील पाणवठ्यावर व जलाशयांवर आढळणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांमध्ये डिमोसाईल क्रे न, बारहेडेड गुज, हंटेड गुज, व्हाईट हंटेड गुज, ग्रेलॅग गुज, कुबिल्ड यांचा समावेश आहे. त्यांची संख्या दरवर्षी कमी-अधिक होत असते. जंगली बदकांच्या या सात ते आठ जातींसोबतच हंस प्रजातीमधील पक्षीही येतात. चिखलात उभे राहून भक्ष्य शोधणाऱ्या ‘चिखल्या’ प्रकारातील पेलिकॉन, गडवाल यासोबतच मलार्ड, पिंटेल, स्पॉटबिल्ड डक, कॉमन टिल, नॉर्थन पिंटेल हे पक्षीही आपल्याकडे आलेले दिसतात. हिवाळ्यामध्ये तीन प्रकारचे ससाणेही आपल्याकडे येतात. यंदा कोराडी तलावावर मागील पंधरवड्यात सुमारे ५० च्या संख्येत रेड क्रेस्टेड पोचार्ड आढळून आले. गतवर्षी त्यांची संख्या दीडशेच्या जवळपास होती, असे सांगितले जाते. यासोबतच सायकी प्रकल्पावर गेल्या पंधरवड्यात सुमारे ७० च्या अधिक संख्येत बारहेडेड गुज आढळले.