कामठी : परमात्मा एक सेवकचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त परमपूज्य परमात्मा एक सेवक बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने आजनी (ता. कामठी) येथील परमात्मा एक भवनात कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी बाबा जुमदेवजी यांचे कार्य व व्यसनमुक्ती यावर मार्गदर्शन करण्यात आले.
समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी तसेच गोरगरिबांना व्यसनमुक्तीचा सल्ला देत व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी बाबा जुमदेवजी यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याचा वसा सेवक व सेविकांनी घेऊन व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी प्रयत्न करायला हवे, असे प्रतिपादन सरस्वती मोहतुरे यांनी केले. यावेळी बाबा जुमदेवजी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रदीप भोकरे, हरीश भोयर, रवी मोहतुरे, रमेश नखाते, श्रावण सावरकर, रवी देवतळे, एस. लुटे, मनीष नखाते यांच्यासह सेवक व सेविका उपस्थित हाेत्या.