Procurement of development initiatives of 281 crores is pending before the cabinet | दीक्षाभूमी विकासाचा २८१ कोटीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमक्ष प्रलंबित
दीक्षाभूमी विकासाचा २८१ कोटीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमक्ष प्रलंबित

ठळक मुद्देसरकारची हायकोर्टात माहिती : सुनावणी दोन आठवडे तहकूब

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : आंतरराष्ट्रीय श्रद्धास्थळ असलेल्या दीक्षाभूमीचा दोन टप्प्यांमध्ये सर्वांगीण विकास करण्यात येणार असून त्यासाठी २८१ कोटी रुपये मंजूर व्हावे याकरिता सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तो प्रस्ताव मंत्रिमंडळासमक्ष मंजुरीसाठी प्रलंबित असल्याची माहिती राज्य सरकारने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. त्यानंतर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी संबंधित जनहित याचिकेवरील सुनावणी दोन आठवडे तहकूब केली.
अ‍ॅड. शैलेश नारनवरे यांनी ही याचिका दाखल केली असून ते स्वत:च याचिकेचे कामकाज पहात आहेत. दीक्षाभूमीच्या विकासाकरिता नोएडा येथील डिझाईन असोसिएट्स इनकॉर्पोरेशनची प्रोजेक्ट आर्किटेक्ट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी दीक्षाभूमीच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये स्तूप विस्तारीकरण, सीमा भिंत, गेट कॉम्प्लेक्स, वॉच टॉवर, पार्किंगसाठी बेसमेंट, शौचालये, पिण्याचे पाणी, कार्यक्रम व्यासपीठ, जलसाठा टाकी, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प इत्यादी विकासकामांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात १००.४७ कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. त्यापैकी ४० कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी १८१ कोटी रुपयाचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे एकूण २८१ कोटी रुपयाचा प्रस्ताव सरकारकडे प्रलंबित आहे.
असे आहे याचिकाकर्त्याचे म्हणणे
दीक्षाभूमी येथे दरवर्षी दसरा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महापरिनिर्वाण दिवस यासह विविध कार्यक्रम होतात. त्यासाठी देश-विदेशातून मोठ्या संख्येत भाविक येतात. परंतु, या ठिकाणी निवास, भोजन, स्वच्छतागृह, परिवहन इत्यादी आवश्यक सुविधा नसल्यामुळे भाविकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. तसेच, दीक्षाभूमीलगतच्या वस्त्यांतील नागरिकांना अव्यवस्थेमुळे त्रास सहन करावा लागतो. एवढेच नाही तर, चेंगराचेंगरी व अन्य अकस्मात दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक काळजी घेतली जात नाही. अनेक वर्षांपासून अशीच परिस्थिती असून त्याकडे अद्याप कुणीही गांभीर्याने लक्ष दिले नाही असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.


Web Title: Procurement of development initiatives of 281 crores is pending before the cabinet
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.