नागपूर : दक्षिण- पश्चिम नागपुरात जयताळा परिसरात अनेक फ्लॅट स्कीम झाल्या आहेत. तेथे सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध आहेत; परंतु या पॉश स्कीमच्या शेजारी असलेल्या स्वस्तिकनगर आणि डोंगरे ले आऊटमधील नागरिकांना मात्र अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या भागात नागरिकांना मूलभूत सुविधाही पुरविण्यात येत नसल्यामुळे ते त्रस्त झाले आहेत.
स्वस्तिकनगरात नाल्याची दुर्गंधी
स्वस्तिकनगराच्या शेजारून एक मोठा नाला गेला आहे. या नाल्याला सुरक्षा भिंत नाही. नाल्याच्या दुर्गंधीमुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. नियमित सफाई होत नसल्यामुळे या भागात डासांचा प्रादुर्भाव होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या नाल्याचे पाणी पावसाळ्यात नागरिकांच्या घरात शिरत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नाल्याला सुरक्षा भिंत बांधण्याची मागणी करूनही त्याकडे लक्ष पुरविण्यात आले नाही. या भागात गडरलाइन नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. गडरलाइन नसल्यामुळे अनेक नागरिक उघड्यावर शौचास जातात. त्यामुळे परिसरात घाण पसरत आहे. महानगरपालिकेने या भागात त्वरित गडरलाइनची व्यवस्था करून देण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
खराब रस्त्यांमुळे वाढले अपघात
स्वस्तिकनगरकडे जाणाऱ्या जयताळा मुख्य रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालविताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचत असल्यामुळे वाहनचालकांना खड्डा दिसत नाही. त्यामुळे अपघात घडतात. स्वस्तिकनगरातील अंतर्गत रस्तेही खराब झाले आहेत. येथेही पावसाळ्यात नागरिकांना चिखलातून मार्ग काढत बाहेर पडावे लागते.
डोंगरे ले आऊटमध्ये हवी गडरलाइनची व्यवस्था
डोंगरे ले आऊटमध्ये गडरलाइनची व्यवस्था नाही. सांडपणी रस्त्यावर तसेच रिकाम्या प्लॉटमध्ये साचून राहते. त्यामुळे दुर्गंधी पसरून डासांचा प्रादुर्भाव होत आहे. सेफ्टिक टँक भरल्यामुळे दूषित पाणी विहिरीत शिरत आहे. येथील अंतर्गत रस्तेही खराब झाले आहेत. सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या नसल्यामुळे पावसाळ्यात रस्त्याचे पाणी नागरिकांच्या घरात शिरते. त्यामुळे महानगरपालिकेने या भागात गडरलाइनची व्यवस्था करून देण्याची मागणी आहे. या भागातही सफाई कर्मचारी नियमित येत नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. गार्डनसाठी जागाच सोडली नसल्यामुळे लहान मुलांची गैरसोय होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
नाल्याला सुरक्षा भिंत उभारावी
‘स्वस्तिकनगर शेजारील नाल्याला सुरक्षा भिंत नसल्यामुळे पावसाळ्यात नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरात शिरते. त्यामुळे या नाल्याला सुरक्षा भिंत उभारण्याची गरज आहे.’
-ललित बुरडे, नागरिक
गडरलाइनची व्यवस्था महत्त्वाची
‘गडरलाइन नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. मोजक्याच लोकांनी सेफ्टिक टँक बांधले आहेत. अनेक नागरिकांना शौचासाठी उघड्यावर जावे लागते. त्यामुळे गडरलाइनचा प्रश्न गंभीर झाला आहे.’
-अशोक हरदे, नागरिक
सफाई कर्मचारी नियमित यावेत
‘स्वस्तिकनगर परिसरात सफाई कर्मचारी नियमित येत नाहीत. त्यामुळे रस्त्यावरील कचरा स्वच्छ होत नाही. नागरिकांनाच परिसराची सफाई करावी लागते. महापालिकेने या भागात नियमित सफाई कर्मचारी पाठविणे गरजेचे आहे.’
-निर्मला पटले, महिला
विहिरींचे पाणी होत आहे दूषित
‘डोंगरे ले आऊट परिसरात गडरलाइन नसल्यामुळे सेफ्टिक टँकचे पाणी विहिरीत शिरत आहे. त्यामुळे विहिरी दूषित होण्याचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी महापालिकेने या भागात गडरलाइनची व्यवस्था करावी.’
-महादेव सोनेकर, नागरिक
मुलांसाठी गार्डन उपलब्ध करून द्यावे
‘डोंगरे ले-आऊटमध्ये लहान मुलांना गार्डनसाठी जागाच सोडण्यात आलेली नाही. त्यामुळे मुलांची गैरसोय होत आहे. तसेच या भागातील अंतर्गत रस्ते दुरुस्त करण्याची गरज आहे.’
-सुनीता सोनवाणे, महिला
................