निवेदन स्वीकारले : अपंगांनी केले होते धरणे आंदोलननागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानासमोर विदर्भ विकलांग संघर्ष समितीतील अपंग बांधवांनी आज सकाळी १० वाजता धरणे आंदोलन केले. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी आपल्या घरासमोरील मैदानात जाऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.विदर्भ विकलांग संघर्ष समितीचे पदाधिकारी गिरीधर भजभुजे यांच्या नेतृत्वात अपंग बांधवांनी मुख्यमंत्र्यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानासमोर असलेल्या मैदानात शनिवारी धरणे आंदोलन सुरू केले. मुख्यमंत्री संत जगनाडे चौकातील कार्यक्रम आटोपून परतत होते. ते आपल्या निवासस्थानाजवळ पोहोचताच अनेकांना ते आत जाऊन विश्रांती करतील असे वाटले. परंतू मुख्यमंत्र्यांनी समोरील मैदानात जाऊन अपंग बांधवांचे निवेदन स्वीकारून त्यांच्याशी चर्चा केली. अपंगांना मिळणाऱ्या ६०० रुपयांच्या मानधनात वाढ करावी, सिकलसेलग्रस्त अपंग बांधवांना विशेष सुविधा द्याव्या, जिल्हातील १२५ अपंग बांधवांचे अडलेले बीज भांडवलाचे कर्ज मिळावे, कर्जाची मर्यादा ५ लाखापर्यंत करावी, अपंग बांधवांना घरकुले द्यावी, आदी मागण्या त्यांनी मुख्यमंत्र्यांपुढे केल्या. यावेळी अपंग बांधवांच्या निवेदनावर सही करून मुख्यमंत्र्यांनी ते संबंधित अधिकाऱ्याकडे पाठविले. (प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतल्या अपंग बांधवांच्या समस्या
By admin | Updated: December 21, 2014 00:14 IST