लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : तालुक्यात झालेल्या संततधार पावसामुळे यावर्षी पशुपालकांना सोयाबीन पिकाच्या नासाडीमुळे चाराटंचाईचा सामना करावा लागत आहे. तालुक्यात ४० हजार ३७१ पशुधन असून, चाराटंचाईची स्थिती पाहता, शासनाने चाराटंचाईच्या निवारणार्थ ५१ क्विंटल वैरण बियाण्यांचे वाटप केले. परंतु, शेतकऱ्यांनी शासनाच्या मदतीची अपेक्षा न करता स्वतःच वैरणाची लागवड केल्याने गुरांच्या वैरणाची समस्या सुटणार आहे.
पशुधनाच्या आकडेवारीनुसार गायवर्गीय पशुधन २२ हजार ४०१, म्हैसवर्गीय पशुधन २,९४०, शेळ्या-मेंढ्या १५ हजार ३० आहेत. यात प्रत्येकी मोठे पशुधन सहा किलो, लहान पशुधन तीन किलो व शेळ्या-मेंढ्यांना ०.६ किलोप्रमाणे संपूर्ण वर्षभरात १ लाख ६१ हजार ६४ मेट्रिक टन चारा लागतो. यापैकी ३९ हजार १५७ मेट्रिक टन चारा पिकाच्या उत्पादनातून मिळणार असून, वैरण पिकापासून ८०० मेट्रिक टन, बांध क्षेत्रातून १५० मेट्रिक टन, वनक्षेत्रातून ३७० मेट्रिक टन, गवती कुरण चराऊ क्षेत्रातून ५०० मेट्रिक टन, पडीक क्षेत्रातून ६०० मेट्रिक टन असा एकूण ४१ हजार ५७७ मेट्रिक टन चारा उपलब्ध होणार आहे.
गहू, हरभरा या पिकांपासून मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध होणार आहे. यामध्ये पशुपालकांना एप्रिल २०२१ मध्ये जिल्हा वार्षिक योजना १०० टक्के अनुदानावर ५१ क्विंटल वैरण बियाणे पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने वितरित करण्यात येत आहे. यामुळे निर्माण होणारी चाराटंचाई टाळण्यास मदत होणार आहे. मात्र, मे, जून महिन्यात गुरांची काळजी घेताना मात्र पशुपालकांची तारांबळ उडणार आहे.
...
सोयाबीन पिकापासून मोठ्या प्रमाणात चारा मिळत होता. परंतु, निसर्गाच्या लहरीपणामुळे सोयाबीन पीक पूर्णत: उद्ध्वस्त झाले. तालुक्यात उपलब्ध चाऱ्याची स्थिती लक्षात घेता, जून महिन्यात वेळेवर पाऊस आला नाही, तर कमी-अधिक प्रमाणात चाराटंचाई निर्माण हाेऊ शकते.
- डाॅ. हेमंत माळोदे, पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती, कळमेश्वर.