विदर्भात टुरिझम वाढीसाठी खासगी उद्योजकांकडूनच आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 11:17 AM2020-01-01T11:17:32+5:302020-01-01T11:19:42+5:30

नागपूरलगतच्या स्थळांचा विचार करता नवेगाव बांध, इटियाडोह, नागझिरा, रामटेक, पारडसिंगा, टाकळघाट, सेवाग्राम, आनंदवन, रामदेगी, हेमलकसा, प्रस्तावित गोरेवाडा आदी प्रकल्पांचाही पर्यटनाच्या माध्यमातून मोठा विकास होऊ शकतो.

Private entrepreneurs hope for tourism growth in Vidarbha | विदर्भात टुरिझम वाढीसाठी खासगी उद्योजकांकडूनच आशा

विदर्भात टुरिझम वाढीसाठी खासगी उद्योजकांकडूनच आशा

Next
ठळक मुद्देशासनानेही लक्ष घालावे निर्माण होऊ शकते मोठी गंगाजळी

गोपालकृष्ण मांडवकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पर्यटनाला नागपूरसह परिसरातील क्षेत्रात मोठा वाव आहे. या व्यवसायातून मोठी गंगाजळी निर्माण होऊ शकेल, एवढे मोठे विस्तारित हे क्षेत्र असले तरी शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे नागपूर आणि विदर्भातील पर्यटनाचा हवा तसा उपयोग करून घेण्यात आला नाही. गेल्या सरकारच्या काळात या क्षेत्राला वाव मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र फारसे भरीव असे मिळाले नाही. सरत्या २०१९ चा विचार केला तर या वर्षानेही पर्यटनाच्या दृष्टीने फारसे काहीच पदरात टाकले नाही.
वनपर्यटन, इको टुरिझम, हेरिटेज, मंदिरे असा विविधांगी आयाम नागपूरच्या पर्यटनाला आहे. नागपूरच्या दीक्षाभूमीला वर्षभरात भेट देणाऱ्यांची संख्या लाखांवर आहे. वनपर्यटनाला येणाऱ्यांचीही संख्या अधिक आहे. किल्ले, ऐतिहासिक इमारती, जंगल, संरक्षित जंगल, अभयारण्य, मंदिरांची संख्या आपल्याकडे अधिक प्रमाणावर आहे. त्यांना उत्सुकतेपोटी आणि अभ्यासापोटी भेट देणाऱ्यांची संख्या अधिक आहे. हे पर्यटन
व्यावसायिकदृष्ट्या विकसित केले असते तर नागपूरच्या विकासात अधिकची भर पडली असती. नागपूरलगतच्या स्थळांचा विचार करता नवेगाव बांध, इटियाडोह, नागझिरा, रामटेक, पारडसिंगा, टाकळघाट, सेवाग्राम, आनंदवन, रामदेगी, हेमलकसा, महाकाली मंदिर, चपराळा, आलापल्ली, मार्कंडा यासह ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, पेंच, मानसिंग, उमरेड-कºहांडला, प्रस्तावित गोरेवाडा आदी प्रकल्पांचाही पर्यटनाच्या माध्यमातून मोठा विकास होऊ शकतो.
गत वर्षात काय मिळाले
गेल्या २०१९ मध्ये काय मिळाले या प्रश्नाचा विचार करता अधिक नाही, असे उत्तर येते. घोषणा अणि प्रयत्न भरपूर झाले. मात्र त्यातुलनेत फारसे मिळाले नाही. गोरेवाडा प्रकल्प निर्मितीच्या दृष्टीने प्रयत्न झाले. मात्र अद्याप हा प्रकल्प सुरू झालेला नाही. अंबाझरी जैवविविधता उद्यान सुरू झाले. ही मात्र या वर्षातील वनपर्यटनाच्या दृष्टीने उपलब्धी ठरली. पेंच, मानसिंगदेव, उमरेड-कºहांडला, ताडोबा या लगतच्या वनसंरक्षित क्षेत्रांच्या पर्यटनविषयक विकासाच्या दृष्टीनेही फारसे यशदायी असे काहीच मिळाले नाही. नागपूर शहरात मोठ्या प्रमाणावर हेरिटेज इमारती आहेत. मात्र त्यासंदर्भातही वर्षभरात कोणतेही भरीव काम झाले नाही. हिवाळी अधिवेशनात दीक्षाभूमीच्या विकासासाठी निधीची मंजुरी मिळाली आहे. त्यातून दीक्षाभूमीच्या विकासाची कामे नववर्षात होतील, अशी अपेक्षा आहे.
यासाठी धरावा लागेल आग्रह
शासनाने पुढाकार घ्यावा : नागपुरातील पर्यटनाच्या विकासासाठी शासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे.
खाद्यपदार्थांच्या सोयी : पर्यटकांना खाद्यपदार्थांच्या सोयी मिळाव्यात. स्थानिक खाद्यपदार्थांचे तसेच कलांचे ब्रॅन्डिंग व्हावे.
टुरिस्ट गाईड : टुरिस्ट गाईड निर्माण व्हावेत. त्यातून नवा रोजगार तरुणांना मिळावा. त्यांच्या माध्यमातून स्थानिक संस्कृतीचे संवर्धन आणि प्रसार व्हावा.
व्यापारवाढीसाठी प्रोत्साहन : पर्यटनातून केवळ भ्रमंती हाच हेतू न ठेवता व्यापारवाढीच्या दृष्टीनेही प्रोत्साहन मिळेल, असे धोरण आखले जावे. स्थानिक उत्पादनांचे प्रदर्शन, विक्रीची व्यवस्था त्यात असावी. खाद्यपदार्थांसह बांबू, चिनीमाती निर्मिती वस्तू अशा बाबींचा यात समावेश असावा.

पर्यटन विकासाच्या दृष्टीने शासनस्तरावर घोषणा भरपूर झाल्या. मात्र म्हणावे तसे भरीव प्रयत्न झाले नाही. कालबद्ध उपक्रम राबविण्यात न आल्याने कुणालाच लाभ झाला नाही. ब्रॅन्डिंग न झाल्याने पर्यटकांचा ओघ वाढविण्यात आपण मागे पडलो.
- चंद्रपाल चौकसे, पर्यटन मित्र

Web Title: Private entrepreneurs hope for tourism growth in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :tourismपर्यटन