लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहात वादातून एका कैद्यावर कुदळीने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात कैदी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना कारागृहातील बॅरेक क्रमांक दोन व तीनसमोर घडली. धंतोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काळू कांतीलाल बांते (वय २७) असे जखमी कैद्याचे नाव आहे. तर सय्यद फय्याज ऊर्फ छोटा सरफराज सय्यद सुलतान (२४) हा आरोपी आहे. दोघेही वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये तुरुंगात आहेत. मंगळवारी सकाळी ११ वाजता काळू त्याच्या सहकारी कैद्यांसह बॅरेक क्रमांक दोन आणि तीनसमोर जमीन खोदत होता.
दरम्यान, आरोपी फय्याज तिथे आला. त्याने शिवीगाळ करून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. काळूला काही समजण्यापूर्वीच फय्याजने एका कैद्याच्या हातातून कुदळ हिसकावली व काळूवर हल्ला केला. या हल्ल्यात काळू गंभीर जखमी झाला. आवाज ऐकून तुरुंग कर्मचारी तेथे पोहोचले व त्यांनी फय्याजकडून कुदळ हिसकावून घेतली. जखमी काळूला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले.
फय्याजविरुद्ध मारहाणीचा गुन्हाघटनेची माहिती मिळताच धंतोली पोलिस कारागृह परिसरात पोहोचले. त्यांनी फय्याजविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे तुरुंगात गुन्हेगारांमध्ये सुरू असलेला संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुरुंगात दररोज कैद्यांमध्ये हाणामारी आणि हल्ल्याच्या घटना घडतात. त्या कारागृह प्रशासनाकडून सातत्याने दडपल्या जातात.